ETV Bharat / state

Thane Crime : वर्दळीच्या रस्त्यावरच तरुणावर दोन हल्लेखोरांचा चाकू हल्ला

author img

By

Published : Jan 30, 2023, 5:54 PM IST

Updated : Jan 30, 2023, 8:16 PM IST

उल्हासनगर रेल्वे स्थानकासमोरील वर्दळीच्या रस्त्यावरच एका तरुणावर दोन हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना दृश्य मोबाईलमध्ये गर्दीतील काहींनी चित्रित केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Thane Crime
तरुणावर चाकू हल्ला

तरुणावर चाकूहल्ला

ठाणे : बाजारपेठ असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी शेकडो नागरिकांच्या समोर हल्लेखोर तीक्ष्ण हत्याराने तरुणावर हल्ला करत असतानाच विठ्ठलवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन एका हल्लेखोराला ताब्यात घेतले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.


हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल : हल्लेखोर अनिल सावंत आणि त्याच्या साथीदाराने काल रात्रीच्या सुमारास उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या समोरील रस्त्यावर एका तरुणावर अचानक चाकूहल्ला केला. तरुणाने जीव वाचविण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढला. मात्र, दोन्ही हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याला पुन्हा गाठले. त्यानंतर त्याच्या अंगातील शर्ट फाडून त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. सध्या उल्हासनगरच्या रेल्वे स्थानक परिसरातील तरुणावर चाकू हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी एका हल्लेखोराला घटनास्थळी ताब्यात घेतले. मात्र दुसरा हल्लेखोर पळून गेला. चाकू हल्लात जखमी झालेला तरुण भयभीत झाल्याने तो तरुण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आला नसल्याने त्याचे नाव समजू शकले नाही.

आरोपीविरुद्ध थातुरमातूर कारवाई : ताब्यात घेतलेल्या हल्लेखोर सावंतवर विठ्ठलवाडी पोलिसांनी त्याला अटक न करता, केवळ प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलीस कायद्या १५१ प्रमाणे कारवाई करून त्याला सोडून दिले. परंतु, गुन्हेगार प्रवृत्तीच्या हल्लेखोराच्या हातात स्पष्टपणे धारधार हत्यार दिसत असून भर रस्त्यावर दहशत माजवत असताना देखील पोलिसांनी याच्या विरोधात आर्म ऍक्ट आणि दहशत माजवण्याचा गुन्हा का दाखल केला नाही? तसेच अशा गुन्हेगारांना पोलीस पाठीशी का घालतात? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा उल्हासनगर शहरात कायदा सुव्यवस्था कुठे आहे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आरोपी बड्या नेत्याचा कार्यकर्ता ? सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलेला हल्लेखोर सावंत हा उल्हासनगर मधील शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा खास कार्यकर्ता असल्याने त्यासाठी पोलिसांवर त्या बड्या नेत्याने दबाव आणल्याची चर्चा आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. तसेच तक्रारदार तरुण हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला नसल्याचे सांगून या हल्ल्यात कोणी जखमी नसून हल्लेखोर आणि जखमी तरुण हे दोघेही मित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Narendra Dabholkar Murder Case : बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात सीबीआयचा तपास पूर्ण

Last Updated :Jan 30, 2023, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.