ETV Bharat / state

chhatrapati Shivaji Maharaj Hospital : मृत व्यक्तीवर आयसीयूत डॉक्टरांकडून 5 तास उपचार-जितेंद्र आव्हाड यांचा दावा

author img

By

Published : Aug 11, 2023, 9:55 AM IST

Updated : Aug 11, 2023, 3:44 PM IST

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांवर व्यवस्थित उपचार सुरू नसल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या रुग्णालयातील मृत रुग्णांवर आयसीयूमध्ये 5 तास उपचार केला जात असल्याचा दावादेखील आमदार आव्हाड यांनी दावा केला.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय

जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी आमदार

ठाणे : महानगरपालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अनागोंदी कारभार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणला आहे. उपचार मिळत नसल्याने 5 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मृत व्यक्तींना आयसीयूमध्ये नेऊन त्यांच्यावर 5 तास उपचार केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा भांडाफोड खुद्द आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नेहमीच चर्चेत राहणारे ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

आव्हाडांचा संताप : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाविषयी अनेक तक्रारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काल आव्हाड यांनी रुग्णालयात भेट दिली. त्यावेळी धक्कादायक परिस्थिती समोर आली. रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराविषयी जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रुग्णालय प्रशासन आणि राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.

काय म्हणाले आव्हाड :

ठाणे शहरातील गोरगरीब रुग्णांसह जिल्ह्यातील रुग्णांचे आधारवड म्हणून ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पहिले जाते. मात्र आज याच रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली. मुख्यमंत्री ठाणे शहराला स्मार्ट सिटी करत आहेत. शहरभर कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे याच ठाण्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र दिसून येत आहे. मल्टीस्पेशालिटी, टाटा कर्करोग रुग्णालयाची उभारणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी, सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाची उभारणी करणे गरजेचे आहे.

ट्विट पोस्टनुसार : आमदार जिंतेद्र आव्हाड यांच्याकडे छत्रपती रुग्णालयाविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी रुग्णालयाला भेट देण्याचे ठरवले. यावेळी त्यांच्यासमोर घडलेला प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. रुग्णालयातील रुग्ण दगावले असतानाही त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार केला जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर तब्बल पाच तास त्यांच्यावर उपचार केला जात असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच रुग्णालयातील प्रकार पाहून आमदार जितेंद्र आव्हाड संतापले. रागात आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाचे डीन यांना कडक शब्दात समज दिली.

रुग्णालयात 5 रुग्ण दगावले - जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टरांची बोलती बंद झाली. मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे दाखवून त्या रुग्णांच्या पार्थिवाला आयसीयूमध्ये नेण्यात येते. तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना या दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रुग्णालयाकडून स्पष्टीकरण : दरम्यान आमचा रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर कळवा रुग्णालय प्रशासनकडून देखील खुलासा करण्यात आला आहे. कळवा रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता संपली असून आयसीयूदेखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. जे 3 रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते, असा खुलासा प्रशासनाने केला आहे. तसेच 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-

  1. Thane Civil Hospital : पाय जायबंदी होऊन देखील डॉ. कैलास पवार रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर
  2. Jitendra Awhad Reaction: तुम्हाला नेमणूक करण्याचा अधिकार कोणी दिला - जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
Last Updated :Aug 11, 2023, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.