ETV Bharat / state

Ganesh Festival 2023 : ठाण्यात दीड लाख बाप्पांची होणार प्राण प्रतिष्ठापना! १ हजार ५२ सार्वजनिक बाप्पा विराजमान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 12:13 PM IST

Ganesh Festival 2023
संपादित छायाचित्र

Ganesh Festival 2023 : ठाण्यात आज गणेश उत्सवाचा मोठा जल्लोष दिसून येत आहे. ठाण्यात 1 लाख 46 हजाराहून अधिक बाप्पांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्यातही 1 हजार 52 सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार आहेत.

ठाणे Ganesh Festival 2023 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी भक्तांकडून झाली असून ठाण्यात जवळपास 1 लाख 46 हजार 250 बाप्पांच्या मूर्तींची विधीवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 45 हजार 198 तर सार्वजनिक मंडळाच्या 1 हजार 52 बाप्पांचे वाजतगाजत आगमन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... या गजरात हातात टाळ, मृदुंग तर ढोल आणि डिजेच्या तालावर ठेका धरत रस्ते दुमदुमणार आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा सुमारे 6 हजार बाप्पांची ( Ganesh Festival ) शहरी भागांमध्ये वाढ झाल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

Ganesh Festival 2023
ठाण्यात दीड लाख बाप्पांची होणार प्राण प्रतिष्ठापना

बाप्पांच्या मूर्तींची होणार विधीवत प्राण प्रतिष्ठापना : ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भाग परिसरातील कोकणवासीय आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. याच शहरी भागात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या मूर्तींची विधीवत प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. गणेश उत्सव आणि कोकणवासीयांचं एक अतूट नातं आहे. या उत्सवाला नकळत चाकरमानी हे हमखास कोकणात जातातच. रेल्वे, लालपरीला कितीही गर्दी असली, किंवा खड्डे असलेल्या रस्त्यांवरुन चाकरमानी या उत्सवाला जातातच.

Ganesh Festival 2023
सुरक्षा व्यवस्था

परिवहन विभागामार्फत टोल फ्री पासचं वाटप : यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि रेल्वे प्रशासनानं मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यातच खासगी गाड्या घेऊन जाणाऱ्यांसाठी परिवहन विभागामार्फत टोल फ्री पासचं वाटप केल्यानं कोकणवासीयांनी लवकर कोकण गाठलं आहे. याशिवाय, ठाणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार त्या आयुक्तालयाचा पाच परिमंडळ कार्यक्षेत्रात एकूण 1 लाख 46 हजार 250 बाप्पांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सार्वजनिक असो वा घरगुती, आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठिकाणी बाप्पांचं आगमन झालं आहे. तर काही तासांनी बाप्पांचं आगमन धुमधडाक्यात होणार असल्यानं बच्चे कंपनीपासून आबालवृद्ध ही कधी बाप्पा येतात याच्याकडं डोळे लावून बसल्याचं पाहण्यास मिळत आहे.

उल्हासनगर परिमंडळात सर्वाधिक बाप्पा : उल्हासनगर शहरासह अंबरनाथ, बदलापूर या परिसरात सर्वाधिक सार्वजनिक आणि घरगुती श्रींचं आगमन होणार आहे. त्या खालोखाल कल्याण-डोंबिवलीत बाप्पा काही दिवसांच्या मुक्कामी येणार आहेत. उल्हासनगरात सार्वजनिक 294 तर घरगुती 47 हजार 129 बाप्पांचं आगमन होणार आहे.

गौरीमातांची संख्या वाढली : उल्हासनगरात सर्वाधिक 6 हजार 107 ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गुरुवारी 21 सप्टेंबरला 14 हजार 845 गौराई मातेचं आगमन होणार आहे. यामध्ये सर्वाधिक उल्हासनगर परिमंडळामध्ये 6 हजार 107, त्या खालोखाल कल्याण- 4 हजार 446, वागळे इस्टेट - 1 हजार 993, ठाणे शहर- 1 हजार 726 आणि भिवंडीत 573 गौराई मातांचा समावेश आहे.

अनंत चतुर्दशीपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त : गणेश उत्सवासाठी ठाणे शहर पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. आयुक्तालयासह पोलीस महासंचालक कार्यालयाकडून संख्याबळ उपलब्ध झाल्यानं एकूण साडेचार हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार आहे. याशिवाय एसआरपीएफ 5 प्लाटून, एक कंपनी तसेच आरसीपीच्या 2 कंपन्याही असणार आहेत. यामध्ये 4 अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 8 पोलीस उपायुक्त,17 सहाय्यक पोलीस आयुक्त, 119 पोलीस निरीक्षक, 302 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 3 हजार 295 पोलीस कर्मचारी, 250 प्रशिक्षणार्थी कर्मचारी, 15 प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस निरीक्षक-पोलीस उपनिरीक्षक, 700 होमगार्ड यांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा :

  1. Ganesh Festival २०२३ : ठाण्यात भरला अनोखा मोदक महोत्सव; आकर्षक मोदकांनी घातली भाविकांना भुरळ
  2. Ganeshotsav २०२३ : 'या' बाप्पाचं हृदय धडधडतं, श्वास घेतो आणि मोदकही खातो! पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.