ETV Bharat / state

ओळखीचा फायदा घेत व्यापारी महिलेला घातला ४ लाखांचा गंडा; नवरा-बायकोविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Apr 24, 2021, 5:07 PM IST

मुथूट फिनकॉप यांच्याकडे आरोपी नवरा बायकोने दागिने गहाण ठेवले. त्याच्या कर्जाचेही हफ्ते न भरता दोघेही नवरा बायको बदलापूरातून पसार झाले.

व्यापारी महिलेची फसवणूक
व्यापारी महिलेची फसवणूक

ठाणे - नवरा बायकोने एका व्यापारी महिलेकडून बहाण्याने दागिने घेऊन ते गहाण ठेवत त्या व्यापारी महिलेला ४ लाख ६२ हजार रुपयांचा चुना लावून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या नवरा बायको विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नवरा बायकोचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. महेंद्र दोंदे आणि पल्लवी दोंदे असे लाखोंचा चुना लावून फरार झालेल्या नवरा बायकोची नावे आहेत.

'या' अटीवर घेतले होते आरोपींनी दागिने
बदलापूर पूर्व, कात्रप भागातील नवीन डीपी रोडवर वैशाली देशमुख (वय ३६) यांचे श्री सद्गुरू कृपा मॅचींग सेंटर नावाने साडीचे दुकान आहे. काही महिन्यांपासून आरोपी दोंदे दांपत्यानी व्यापारी असलेल्या वैशाली यांच्याशी मैत्री केली. त्यांनतर मैत्रीचा फायदा घेत, विश्वास संपादन करून ३ डिसेंबर २०२० रोजी आरोपींनी नातेवाईकाच्या लग्नात जायचे आहे. त्यामुळे चार दिवसासाठी तुमच्याकडील दागिने वापरण्यासाठी द्या म्हणून वैशाली यांच्याकडे विनवणी केली. वैशाली यांनीही आरोपी नवरा बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना चार लाख ६२ हजार रुपयांचे दागिने चार दिवसात परत करण्याच्या अटीवर दिले.

दागिने परस्पर गहाण . ..
वैशाली देशमुख यांच्याकडून दागिने घेऊन नवरा-बायकोने बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील मुथूट फिनकॉप यांच्याकडे ४ लाख ५२ हजार रुपयांत परस्पर गहाण ठेवले. तर दुसरीकडे बरेच दिवस दागिने घेऊन परत न केल्याने वैशाली यांनी आरोपी नवरा बायकोकडे माझे दागिने परत द्या, म्हणून तगादा लावला होता. मात्र, उलट वैशाली यांनाच गुन्हा दाखल करण्याची आरोपींनी धमकी दिली.

नवरा बायकोवर ४२०चा गुन्हा दाखल ..
मुथूट फिनकॉप यांच्याकडे आरोपी नवरा बायकोने दागिने गहाण ठेवले. त्याच्या कर्जाचेही हफ्ते न भरता दोघेही नवरा बायको बदलापुरातून पसार झाले. त्यांनतर आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर वैशाली यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेऊन नवरा बायको विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार भादंवी कलम ४२०, ४०६, ५०६, ३४प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. डी. बुऱ्हाडे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.