ETV Bharat / state

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुंब्र्यात येण्यापूर्वीच 'पेटलं रान' ; अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले स्वागताचे बॅनर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 2:15 PM IST

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले स्वागताचे बॅनर

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिवसेना मध्यवर्ती शाखा पाडल्यामुळे ठाण्यात मोठा राडा होण्याची शक्यता आहे. उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात जाणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच त्यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यात तणाव निर्माण झाला असून मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ठाणे Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज मुंब्र्यातील तोडलेल्या शाखेला भेट देण्यावरुन चांगलचं रान पेटलं आहे. 2001 पासून मुंब्रा कौसा इथं सुरू असलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर दोन नोव्हेंबरला बुलडोजर फिरल्यानंतर उद्धव ठाकरे या शाखेला भेट देणार होते. यासाठी अनेक दिवसापासून तयारी देखील सुरू होती. परंतु त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं लावलेले बॅनर्स शुक्रवारी अज्ञातांनी फाडल्यानंतर मुंब्रा इथं चांगलाच तणाव पसरला आहे. याप्रकरणी आपण पोलिसांना आधीच सावध केलं होतं, असं ट्विट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करुन चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
अज्ञात कार्यकर्त्यांनी स्वागताचे बॅनर फाडल्यानंतर जमलेले कार्यकर्ते

शिवसेना मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर : शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर दोन्ही पक्षातील तणाव हळूहळू शिगेला पोहोचत आहे. शिवसेना उबाठा आणि शिंदे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गट या चारही गटांमध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळत आहे. चारही पक्षात आपापसात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. त्यातच दोन नोव्हेंबरला मुंब्रा इथं असलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरल्यानंतर वातावरण प्रचंड तंग झालं आहे. 2001 साली बांधण्यात आलेल्या या शाखेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट प्रयत्नशील होते. परंतु दोन नोव्हेंबरला या शाखेवर बुलडोझर फिरवून भुईसपाट करण्यात आल्यानं हा वाद विकोपाला गेला आहे.

अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले उद्धव ठाकरेंचे बॅनर : मध्यवर्ती शाखा पाडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या शाखेच्या जागी उभारण्यात आलेल्या कंटेनरमधील शाखेला भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जितेंद्र आव्हाड यांनी बॅनर लावले होते. शुक्रवारी रात्री हे बॅनर्स अज्ञातांनी फाडल्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत मुंब्रा पोलिसांचे वाभाडे काढले आहेत. आपण असे बॅनर फाडले जातील, याची पूर्वकल्पना पोलिसांना आधीच दिली होती. परंतु पोलिसांनी त्या संदर्भात कोणतीही कारवाई न केल्यानं यात पोलिसांच्या भूमिकेबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली. तर ही शाखा आमचीच असून त्यावर आमचेच वर्चस्व राहील असं ठाम मत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी व्यक्त केलं. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादानं ही शाखा सुरू झाली होती. त्यामुळे तिचा ताबा आपल्याकडचं राहील, असं देखील त्यांनी सांगितलं.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात : उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाणे आणि मुंब्रा इथल्या दौऱ्यावरून पोलीस यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. याबाबत अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

काय झाला होता वाद : शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्यापासूनचं ठाण्यातल्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ताबा घेण्यावरून वाद पेटत होते. श्रीनगरमध्ये तर चक्क हाणामारीपर्यंत प्रकार गेला. आता पुन्हा एकदा मुंबईतली ही मध्यवर्ती शाखा अचानकपणे जेसीबी लावून तोडल्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालेला पाहायला मिळतोय. ही शाखा तोडण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे द्वेशातून ही शाखा तोडल्याचा आरोप ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

Maratha Reservation : 'फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देण्याच्या नादात उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचा घात केला'

Sanjay Raut On CM : मुंब्र्यात विरोधकांच्या छातीवर पाय देऊन समाचार घेणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.