ETV Bharat / state

New Year 2022 : कसे असेल नवीन वर्ष, किती ग्रहण असतील, लग्नाचे मुहूर्त किती? पाहा, सांगतायेत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

author img

By

Published : Jan 1, 2022, 3:32 AM IST

Updated : Jan 1, 2022, 4:27 AM IST

येणारे वर्ष हे लीपवर्ष नसल्याने वर्षात एकूण ३६५ दिवस काम करण्याची संधी मिळणार असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ( Almanac D. K. Soman On New Year 2022 )

Almanac D. K. Soman
पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

ठाणे - शुक्रवारी वर्ष संपत असतांना ‘लीप सेकंद‘ धरला गेला नसल्याने नवीन वर्ष सन २०२२ चा प्रारंभ आज (शुक्रवारी) रात्री ठीक १२ वाजता होणार आहे. हे नववर्ष काम करणाऱ्यांसाठी महत्वाचे असणार आहे. सन २०२२मध्ये एकूण मिळणाऱ्या २४ सुट्ट्यांपैकी ६ सुट्ट्या रविवारी येत आहेत. तसेच येणारे वर्ष हे लीपवर्ष नसल्याने वर्षात एकूण ३६५ दिवस काम करण्याची संधी मिळणार असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण नवीन वर्ष 2022 बद्दल सांगताना
  • असे असणार नवीन वर्ष २०२२
  1. २४ पैकी ६ सुट्ट्या रविवारी
  2. भारतातून चंद्र-सूर्य ग्रहण दिसणार
  3. दोन वेळा सुपरमून दिसणार
  4. दोन अंगारकी, तीन गुरुपुष्ययोग
  5. वर्षातील ९ महिने विवाह मुहूर्त
  • सन २०२२ मध्ये एकूण मिळणार्या २४ सुट्ट्यांपैकी रविवारी येणारे सण
  1. श्रीरामनवमी १० एप्रिल
  2. महाराष्ट्र दिन १ मे
  3. बकरी ईद १० जुलै
  4. महात्मा गांधी जयंती २ ॲाक्टोबर
  5. ईद-ए-मिलाद ९ ॲाक्टोबर
  6. ख्रिसमस २५ डिसेंबर, अशा ६ सुट्ट्या रविवारी येत आहेत

हेही वाचा - Mumbai New Year Celebration : मरीन ड्राईव्हवर शुकशुकाट; मुंबईकरांनी दिली पोलिसांच्या आवाहनाला साथ

उल्कावर्षाव पहाण्याची संधी -

२०२२ मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी मंगळवार २५ ॲाक्टोबरचे खंडग्रास सूर्यग्रहण आणि मंगळवार ८ नोव्हेंबरचे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. मात्र, शनिवार ३० एप्रिलचे खंडग्रास सूर्यग्रहण आणि सोमवार १६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. खगोलप्रेमींसाठी सन २०२२ या नूतन वर्षी ४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ॲागस्ट, २२ ॲाक्टोबर, १७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबरच्या रात्री आकाशात उल्कावर्षाव पहाण्याची संधी प्राप्त होणार आहे.

तीन गुरुपुष्यामृत योग -

सन २०२२मध्ये मंगळवार १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या आणि बुधवार १३ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येणार असल्याने आपणास दोन वेळा 'सुपरमून' पाहायला मिळणार आहे. सन २०२२मध्ये कोणत्याही इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येत नसल्याने 'ब्ल्यू मून' योग मात्र यावर्षी येणार नाही. २०२२ या नूतन वर्षात सुवर्ण खरेदी करणाऱ्यांसाठी ३० जून, २८ जुलै आणि २५ ॲागस्ट असे तीन गुरुपुष्यामृत योग येणार आहेत.

गणेशभक्तांसाठी सन २०२२ मध्ये १९ एप्रिल आणि १३ सप्टेंबर रोजी अशा दोन अंगारकी संकष्ट चतुर्थी येणार आहेत. सन २०२२ मध्ये ॲागस्ट, सप्टेंबर आणि ॲाक्टोबर असे तीन महिने वगळता इतर ९ महिन्यांत विवाह मुहूर्त असल्याने विवाहेच्छुक खुश होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.

Last Updated : Jan 1, 2022, 4:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.