ठाणे: डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरीचे गुन्हे वाढल्याने या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस उप आयुक्त सचिन गुजाळ यांनी विशेष मोहीम राबविण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सपोनिरी, सुनिल तारमळे, वणवे यांच्यासह विशेष पथक स्थापन करून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी तपास सुरू केला. पोलीस तपासावेळी एक संशयित व्यक्ती एका इमारतीच्या खाली सुरक्षा रक्षकासोबत बोलत असल्याचे घरफोडी झालेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीला अटक: या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या त्या संशयित व्यक्तीचा शोध सुरु केला असता, हा व्यक्ती अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस पथकातील सपोनिरी, वणवे, सुनिल तारमळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा, खिलारे, गडगे, ठिकेकर, पवार, पाटील, माळी, मासाळ, पोना भोईर, किनरे, या पथकाने व्दारली गावात सापळा रचून आरोपी शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चैनाळे याला ताब्यात घेतले.
१२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत: पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मानपाडा, डोंबिवली आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदाराच्या मदतीने बंद घराचे कुलूप, कडी कोयंडा तोडून १० घरफोडी केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानंतर घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून १० घरफोडीच्या गुन्ह्यातील २०० ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
10 घरफोड्या केल्याची कबुली: अटकेतील आरोपी मूळचा कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील राहणारा आहे. तो काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबई परिसरात आला होता. तर गेल्या तीन महिन्यांपासून तो अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत डोंबिवली भागात १० घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याने आणखी काही घरफोड्या केल्याची शक्यता असल्याने पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहे.
दुकानाची भिंत फोडण्याचा प्रयत्न: डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात 22 जानेवारी, 2023 रोजी पहाटेच्या सुमारास दोन ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करत सोने, चांदी असे मिळून तब्बल 13 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला होता. पहाटेच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत श्रीखंडेवाडी परिसरातील शांतीलाल कुंदनलाल सोनी यांचे राजलक्ष्मी ज्वेलर्स नावाने दागिने विक्रीचे दुकान आहे. आज पहाटेच्या सुमारास या ज्वेलर्स दुकानाला लागून असलेल्या दोन्ही दुकानांच्या भिंती फोडून चोरटयांनी राजलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत देखील फोडण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशीही चोरीचा प्रयत्न: चोरीचा प्रयत्न यशस्वी ठरल्याने दोन्ही चोरट्याने तिथून काढता पाय घेतला. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानांना लक्ष केल्याने डोंबिवलीतील ज्वेलर्स दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी दावडी भागात एका जवाहिऱ्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला होता. डोंबिवलीतील वाढत्या भुरट्या, घरफोड्यांमुळे नागरिक, व्यापारी हैराण आहेत.
हेही वाचा: Bhaskar Jadhav on Mohit Kamboj : मोहित कंबोज यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा- भास्कर जाधव