ETV Bharat / state

जागतिक कर्णबधिर दिन विशेष : दिव्यांग सागरची चित्रकला पाहून व्हाल थक्क, शरद पवारांसह अनेक नेत्यांकडून कौतुकाची थाप

author img

By

Published : Sep 29, 2021, 6:10 AM IST

कर्णबधिर लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा कर्णबधिर सप्ताह म्हणून तर 29 सप्टेबर हा दिवस कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो.

world-deaf-day
world-deaf-day

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील राहुलनगर भागातील सागर धुमाळ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास दोन्ही कानाने अतितीव्र स्वरूपाचा श्रवण दोष असून तो मूकबधिर देखील आहे. अशा स्थितीत नशिबाला दोष न देता सागरने अवगत केलेली चित्रकला अनेकांना अंचबित करुन टाकणारी आहे. सागरला जन्मत:च ऐकता व बोलता येत नाही. सागरच्या चित्रकलेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक देखील केले आहे.

World Deaf Day
दिव्यांग सागरची चित्रकला


जन्मत:च दिव्यांग असणे हा काही मानवी जीवनातील अडथळा नाही. दिव्यांगत्वाचे रडगाणे गात हताश बसून नशिबाला दोष देत बसणारे अनेक जण आपल्याला समाजात आढळतात. मात्र दिव्यांग असतानाही प्रयत्न आणी जिद्दीच्या जोरावर आपले बलस्थान ओळखून प्रयत्न केल्यास यशप्राप्ती निश्चित मिळते. हे कृतीतून सागर धुमाळ याने सिध्द करुन दाखवलंय. सागरचे १० वी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले असून १२ वी उत्तीर्ण होऊन तो सध्या मोहोळमध्ये आय.टी.आय.चे शिक्षण घेतोय. महाविद्यालयीन शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कला क्षेत्रात करियर करण्याचा सागरचा मानस आहे.

World Deaf Day
दिव्यांग सागरची चित्रकला

29 सप्टेंबर हा जागतिक कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो. कर्णबधिर व मूकबधिर असल्याचे कसलेही शल्य न बाळगता व मनाने न खचता सागरने दारफळ (सिना) ता.माढा येथील प्रसिध्द युवा चित्रकार रत्नदिप बारबोले यांचेकडून चित्रकलेचे शिक्षण घेतले. एक वर्षाचे चित्रकलेच्या प्रशिक्षणानंतर सागर ने आतापर्यंत विविध प्रकारची सुबक व मनमोहक अशी चित्रे रेखाटली आहेत. महापुरुष, नेतेमंडळी, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, निसर्ग यासह सामाजिक विषयावर त्याने आतापर्यंत १३० हून अधिक चित्रे त्याने आपल्या कलाकृतीने हुबेहुब रेखाटली आहेत.

World Deaf Day
दिव्यांग सागरची चित्रकला

शरद पवार व फडणवीसांची रेखाटली चित्रे -

सागरची आई राणी व वडील संताजी हे दोघेही शेतकरी आहेत. घरची हालाखीची परिस्थिती असतानाही सागरने आपला छंद जोपासत दिव्यांग असतानाही चित्रकलेत वेगळा ठसा उमटवला आहे. सागरने शरद पवार यांचे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गज नेत्यांची लाईव्ह चित्रे काढली. ती चित्रे प्रत्यक्ष भेटून दोन्ही नेत्यांना भेट दिलीत. दोन्हीही नेत्यांनी सागरच्या कलेचे तोंड भरुन कौतुक करत शाबासकीची थाप दिली असून दिव्यांगत्वावर मात करत मिळवलेल्या यशाचे त्यांनी विशेष कौतुकही केले. पुणे व सोलापुर जिल्ह्यातील चित्रकला स्पर्धांमध्ये सागरने गोल्ड मेडल मिळवलंय. प्रख्यात चित्रकार रत्नदीप बारबोले, कलाशिक्षक दीपक गोसावी, रेणुका खिलारे, प्रविण भांगे यांचे मार्गदर्शन सागरला चित्रकलेच्या कलेत मिळत आले आहे. सागरच्या अंगी असलेली कला पाहून आई वडिलांची मान अभिमानाने उंचावत आलीय.

World Deaf Day
दिव्यांग सागरची चित्रकला

हे ही वाचा - World Tourism Day : कास पठारावर आच्छादला रंगीबेरंगी फुलांचा गालिचा ! जैवविविधतेचे हॉटस्पॉट, पाहा PHOTO

कधीपासून साजरा केला जातो कर्णबधिर दिन -

29 सप्टेंबर 1951 पासून जगात कर्धबधिरांच्या प्रश्नांवर काम करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. याच दिवशी इटलीच्या रोम शहरात जागतिक कर्णबधिर महासंघाची वर्ल्ड फेडरेशन ऑफ दी डेफ ची स्थापना करण्यात आली.

यामुळे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने गेल्या सहा दशकांत प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा कर्णबधिर सप्ताह तर शेवटचा रविवार हा आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस म्हणून साजरा केला जात आहे. जगातील कर्णबधिरांसाठी वापरण्यात येत असलेल्या भाषेत अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याची, त्यांना अधिकाधिक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, माहिती आणि सेवा पुरवणे, त्यांना देण्यात येणा-या अधिकारांमध्ये अधिक सुधारणा करणे, त्यासाठी संस्थांची स्थापना करणे आदी कार्य अव्याहतपणे सुरू आहेत. त्यासोबतच जगभरातील कर्णबधिरांसाठी मानवी अधिकार आणि समता मिळवून देणे, त्यांची कर्तबगारी, त्यांचे सांस्कृतिक योगदान जगाच्या समोर आणणे आणि या लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे यासाठी जागतिक कर्णबधिर महासंघाचे कार्य चालते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.