जागतिक कन्या दिन : युवतींसाठी प्रेरणास्रोत मंगळवेढा विभागातील तरुण महिला अधिकारी राजश्री पाटील

author img

By

Published : Sep 26, 2021, 8:47 AM IST

राजश्री पाटील-

आज जागतिक कन्या दिन आहे. यानिमित्ताने मंगळवेढा विभागाच्या पहिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत. त्यांचा प्रवास युवतींसाठी ऊर्जास्त्रोत ठरत आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : राज्य पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांची व्यक्तिगत पातळीवर धाडसीची उदाहरणे असंख्य आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यातून आलेल्या राजश्री पाटील यांचा सामान्य तरुणी ते मंगळवेढा विभागाच्या पहिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. कन्या दिनानिमित्ताने (26 सप्टेंबर) विशेष असा त्यांचा प्रवास युवतींसाठी ऊर्जास्रोत ठरत आहेत.

राजश्री पाटील

भविष्याच्या वाटचालीसाठी सधन कुटुंबातून मिळणारी ऊर्जा

भोसले कुटुंबामध्ये आधुनिक शिक्षणाची फार मोठी परंपरा लाभल्याचे दिसून येते. राजश्री पाटील यांचे वडिल संभाजीराव पाटील हे रसायन शास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यामुळे मुलींना त्यांनी मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिले. मुलींना योग्य दिशा देण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन देण्याचे काम पाटील कुटुंबीयांनी केले. याच प्रेरणेतून राजश्री पाटील यांनी आपले शालेय शिक्षण कन्या शाळेतूनच पूर्ण केले. या शाळेतून शालेय जीवनातूनच आपल्या पैलूंना ओळखण्याची संधी मिळाली. पुढे त्यांच्या पैलूंना आकार देण्याचे काम माध्यमिक शिक्षण व महाविद्यालयीन जीवनामध्ये घडण्यात मदत झाली. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात टेलिकम्युनिकेशन या शाखेतून अभियांत्रिकी शाखेची पदवी संपादन केली.

स्पर्धा परीक्षेतील साध्या व सोप्या पद्धतीच्या अभ्यासामुळे घवघवीत यश

राजश्री पाटील यांनी टेलिकम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या पगाराची नोकरी सोडून राजश्री पाटील यांनी शासकीय सेवेमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यांनी वेळेचे काटेकोर पालन करणे, साध्या व सोप्या पद्धतीचा अभ्यास करण्यावर भर दिला. पहिल्याच प्रयत्नात त्यांना नायब तहसीलदार या पदाची संधीही मिळाली. मात्र पोलीस दलात जाण्याची आवड असल्यामुळे 2019 सालच्या स्पर्धा परीक्षेत उपअधीक्षक पोलीस पदासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर नाशिक येथील पोलीस अ‍ॅकॅडमीमध्ये खडतर वाटणारे प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले.

मंगळवेढा विभागातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी

मंगळवेढा विभागामध्ये पोलीस अधिकारी म्हणून राजश्री पाटील गेल्या सहा महिन्यापासून कारभार पाहत आहेत. या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही त्यांनी आपल्या कामाचीच चुणूक दाखवून दिली. त्यांनी यशस्वीरीत्या निवडणूक पार पाडली. सांगोला व मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन योग्य गुन्ह्याचे विश्लेषण करून मार्गी लावण्याचे काम राजश्री पाटील यांनी केले आहे. त्या सध्या मंगळवेढा विभागातील एक सक्षम महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करताना ग्रामीण पोलीस दलात दिसून येतात.

पती मंत्रालयात अधिकारी

राजश्री पाटील यांचा विवाह मंत्रालयामध्ये अधिकारी म्हणून काम करणारे विक्रम शिंदे यांच्यासोबत झाला आहे. शिंदे कुटुंबीयांनी राजश्री पाटील यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासह जलमार्गांना प्राधान्य देणार - नितीन गडकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.