ETV Bharat / state

डॉक्टर डे स्पेशल : सरपंच डॉक्टराने समाजकार्य करत उचलला मोफत वैद्यकीय सेवेचा विडा

author img

By

Published : Jul 1, 2021, 7:59 PM IST

Sarpanch Doctor
सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे एका सरपंच डॉक्टराने कोविड सेंटर सुरू केले आहे. बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. अमित मधुकर व्यवहारे यांच्या कार्याचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या 'गाव तिथे कोविड सेंटर' या आवाहनाला प्रतिसाद देत मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे एका सरपंच डॉक्टराने कोविड सेंटर सुरू केले आहे. बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. अमित मधुकर व्यवहारे यांच्या कार्याचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोणतेही राजकारण न करता फक्त समाजकारण करत डॉ. अमित व्यवहारे गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या गावातील ग्रामस्थांवर मोफत वैद्यकीय उपचार करत आहेत. 'डॉक्टर डे'च्या निमित्ताने 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

माहिती देताना सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे
  • डॉ. अमित व्यवहारेंचे रशियामधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण -
    Sarpanch Doctor Amit Vyavahare
    वैद्यकीय सेवा देताना सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे

डॉ. अमित व्यवहारे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील आहेत. पंढरपूर कुर्डवाडी रोडलगत छोटेसे आष्टी गाव आहे. डॉ. अमित व्यवहारेंच्या कामाची दखल घेत आष्टी गाव राज्यपातळीवर आले आहे. डॉ. अमित व्यवहारे यांचे एमडी फिजिशियन शिक्षण रशियामधून झाले आहे. तसेच बालरोग तज्ज्ञाचे शिक्षण मुंबई येथून झाले आहे. कोरोना महामरीची दुसरी लाट सुरू झाल्यावर सोलापुरात परिस्थिती गंभीर झाली होती. यावेळी त्यांनी परिस्थितीशी खंबीरपणे तोंड देत आष्टी गावात कोविड सेंटर सुरू केले आणि मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली. आपल्या गावातील ग्रामस्थ बंधूंना कोरोना आजारातून मुक्त करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाचा पुरेपूर फायदा केला.

  • गावकऱ्यांचा सरपंच आणि लाडका डॉक्टर -

डॉ. अमित व्यवहारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान आष्टी या माध्यमातून विविध उपक्रम राबवत होते. सामाजिक क्षेत्राची त्यांना प्रचंड आवड आहे. एका सामाजिक संस्थेमधून त्यांचे सामाजिक कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कार्याला पाहून गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे राहण्याचा सल्ला दिला. सोलापूर जिल्ह्यातील डॉ. अमित व्यवहारे पहिले व्यक्तिमत्त्व आहे ज्यांना गावकऱ्यांनी निवडणुकीत उभे केले आहे आणि सरपंच देखील बनवले. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि सरपंच देखील झाले. डॉ. अमित व्यवहारे हे सरपंच होताच त्यांनी राजकारण करण्यापेक्षा समाजकारणावर अधिक भर दिला.

Sarpanch Doctor Amit Vyavahare
वैद्यकीय सेवा देताना सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे
  • दोन महिन्यांपासून आष्टी गावात कोविड सेंटरमधून मोफत वैद्यकीय सेवा सुरू -

मार्च महिन्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. ग्रामीण भागात झपाट्याने रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य व्यवस्थेवर भयंकर ताण निर्माण झाला. त्यावेळी त्यांनी सिल्वर ओक चाईल्ड स्कूलमध्ये कोविड सेंटर उभे केले. या कोविड सेंटरमध्ये मोफत औषधे, मोफत ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. दिवसभरातून चार ते पाच वेळा या कोविड सेंटरमधील रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णांच्या मदतीसाठी कंपाउंडर आणि नर्स उपलब्ध केल्या. पौष्टिक आहार रुग्णांना देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर विजय प्राप्त केला आहे. अशा अनेक समाजकार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

हेही वाचा - Doctor Day : डॉक्टरांना देवदूत संबोधत आरोग्यमंत्र्यांनी मानले सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार

हेही वाचा - DOCTORS DAY: सैनिक-पोलीस-शेतकरी-अनाथांची मोफत शुश्रूषा; सर्वांनाच मोफत सेवा देण्याचा 'या' डॉक्टरांचा मानस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.