ETV Bharat / state

सोलापूरमधील मृत कोरोना वॉरिअर्सचे नातेवाईक मदतीविना; 50 लाखांच्या सहाय्याची घोषणा हवेतच

author img

By

Published : Sep 19, 2020, 3:04 PM IST

Updated : Sep 19, 2020, 4:35 PM IST

कोरोना काळात सेवा बजावताना संसर्ग झाल्यामुळे सोलापूर महापालिकेच्या 6 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला होता. या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना शासनाने जाहीर केलेली 50 लाखांची मदत मिळालेली नाही. यामुळे कोरोना वॉरिअर्सच्या नातेवाईकांनी 50 लाखांची मदत ही फुसकी घोषणा असल्याची भावना व्यक्त केली.

corona warriors relative not get help
मृत कोरोना वॉरिअर्सचे लाभार्थी वंचित

सोलापूर - कोरोना काळात महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणू संससर्गामुळे मृत्यू झाला. या कोरोनायोद्ध्यांच्या वारसांना आजपर्यंत एक रुपयाची देखील मदत मिळाली नाही. शासनाने कोरोनायोद्ध्यांच्या वारसांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी सोलापूर महापालिकेच्या कामगार संघटनेने केली आहे.

कोरोना वॉरिअर्सचे नातेवाईक मदतीच्या प्रतीक्षेत

कोरोना काळात सोलापुरातील महानगरपालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. हे सर्व कर्मचारी निम्न श्रेणीतील असल्याने त्यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. विश्रांती लिंबाजी उडाणशिवे, शिलवंत रामचंद्र गायकवाड, शोभा धर्मा गायकवाड, राजेंद्र बाबू साळुंखे आणि अन्य एका कामगाराचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या सहा महापालिका कर्मचाऱ्यांचा कोविड- 19 सेवा बजावताना मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा त्यांना योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांचे नातेवाईक करत आहेत.

शासकीय रुग्णालयात बेड नसल्याचे कारण पुढे करून या कोरोनायोद्ध्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला गेला. खासगी रुग्णालयांनी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडे मोठ्या रकमेची मागणी केली. नातेवाईकांना अ‌ॅक्टरमा इंजेक्शन व रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागले. पैशाच्या अभावामुळे या कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने घोषित केल्याप्रमाणे यांना 50 लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी महापालिका कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याने कामगार संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे.

हेही वाचा-'व्यवस्थेने आमचा आधार नेला'; सख्ख्या भावांच्या निधनाने चव्हाण कुटुंबीयांवर कोसळलं आभाळ

Last Updated : Sep 19, 2020, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.