सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसन टाकळी, गुरसाळे येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुनर्वसन टाकळी येथील ग्यानदेव मनोहर गुटाळ (वय80) यांचे अल्पशा आजाराने 19 मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले होते. टाकळी पुनर्वसन येथील नागरिकांचे पुनर्वसन झाल्यामुळे त्यांचे नातेवाईक बहुतांश हे करमाळा, परांडा, बारामती या भागात असल्यामुळे अंत्यविधीस येण्यास नातेवाईकांना उशीर झाला. त्यामुळे ग्यानदेव यांचा रात्री 11.30 वाजता अंत्यविधी करण्यात आला.
असा घडला अपघात: अंत्यविधी करून सर्वजण घराकडे परत येत असतानाच, गावाच्या ओढ्याजवळ आले असतानाच करकंब कडून DN 52 M3564 या क्रमांकाचा एक ट्रक महिलांच्या घोळक्यात घुसला. या झालेल्या अपघातात दोन सख्य्या जावांचा मृत्यू झाला आहे. तर पाच नातेवाईक जखमी झाले आहेत. रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थ यांनी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने पंढरपूर जवळील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले. याच दरम्यान पंढरपूर पोलिसांचे गाडी पेट्रोलिंगसाठी आली होती, पोलिसांना ही तात्काळ जखमींना दवाखान्यात हलवण्यास मदत केली. तसेच ट्रक चालकास ताब्यात घेतले.
दोन सख्य्या जावांचा मृत्यू: या अपघातात मृत ग्यानदेव यांच्या दोन्ही सुनांचा मृत्यु झाला आहे. मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय 50) यांचा उपचार दरम्यान दवाखान्यात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पती असा परिवार आहे. तर हिराबाई भारत गुटाळ वय (45) यांचा जागीच मृत्यु झाला आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. हिराबाई या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या.
अपघातातील जखमी व्यक्ती: या अपघात ग्यानदेव यांची मुलगी सुधमती धुमाळ (४५) रा.लिंबोडी, ता.बारामती, अनिता देवकर (३५) रा.सुगाव भोसे, सुनिता महादेव गुटाळ(५०), रा. चिखठाणा ता. करमाळा, आनंदबाई धनंजय साळुंखे.(वय ४२) रा.चिखठाणा ता. करमाळा, व दत्तात्रय अजिनाथ सरडे (वय४०) रा. चिखठाणा ता. करमाळा, अशी जखमींची नावे आहेत. या अपघाताने संपूर्ण टाकळी गावावर शोककळा पसरली आहे. अपघातातील जखमींना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली. या अपघाताने हसते खेळते गुटाळ कुटुंबीय दुःखात बुडाले आहे.
हेही वाचा -