माढ्यात 10 वर्षांपासून मुस्लिम कुटुंबात मांडली जाते गौरी-गणपती

author img

By

Published : Sep 14, 2021, 5:27 PM IST

Gauri-Ganapati Installation in Muslim family in Madha for 10 years

उदरंगावच्या सय्यद परिवाराने जातीच्या भिंती बाजुला सारून हिंदू रितीरिवाजाप्रमाणे गौरींची स्थापना करण्याची प्रथा जोपासली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या सय्यद कुटूबींयाचे कार्य निश्चितच आदर्शदायी व अनुकरणीय आहे.

माढा (सोलापूर) - रविवारी सायंकाळी घरा-घरात गौरीचे आगमन झाले. माढा तालुक्यातील उंदरगाव येथील मुस्लिम कुटूंब गेल्या १० वर्षांपासून गौराईचे स्वागत करीत आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश त्यांनी यातून दिला आहे. अहमद सय्यद असे त्या परिवाराचे नाव असून मागील १० वर्षांपासून सय्यद परिवार गौरी पूजन करतात. यंदाही त्यांनी प्रतिवर्षी प्रमाणेच थाटामाटात गौरीचे स्वागत केले आहे. "सबका मालिक एक है" हा संदेश यानिमित्ताने या परिवाराने दिला आहे. गौरी उभी करण्याबरोबरच सय्यद परिवाराने घरात गणपतीची स्थापना केली असून दररोज गणरायाची पूजा देखील करतात.

माढ्यात 10 वर्षापासून मुस्लिम कुटुंबात मांडली जाते गौरी-गणपती

रितीरिवाजाप्रमाणे करतात स्थापना -

उदरंगावच्या सय्यद परिवाराने जातींच्या भिंती बाजुला सारून हिंदू रितीरिवाजाप्रमाणे गौरींची स्थापना करण्याची प्रथा जोपासली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या सय्यद कुटूबींयाचे कार्य निश्चितच आदर्शदायी व अनुकरणीय आहे. त्याचे समाजातून कौतुक होत आहे. गौरी उभारण्यासाठी अहमद सय्यद यांना चाॅद, मुन्ना या दोन मुलांसह पत्नी बशिरा, सून शनु याचे सहकार्य लाभत आहे.

माढ्यात 'हे' आहेत विशेष देखावे -

माढ्यातील सन्मतीनगर भागातील स्वाती रामचंद्र उबाळे यांनी रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रीय शेती कशी फायदेशीर आहे. याचे महत्व महालक्ष्मीसमोर आरास (देखावा) उभा करुन पटवून दिले आहे. दरवर्षी उबाळे या नाविन्यपूर्ण आरास (देखावा) उभी करीत असतात. यंदाची ही त्यांची आरास लक्षवेधी अशीच ठरली. तसेच शहरातील क्रांतीनगर भागातील गणेश देवकर या तरुणाने जागरण गोंधळ या लोक कलेचा ६० बाहुल्याचा वापर करुन हलता देखावा महालक्ष्मी समोर उभा केला आहे. यामध्ये तुळजाभवानी मंदिर व घोड्यावरती बसलेला खंडोबा नवरा नवरी जेवताना उभे केला आहे. दरवर्षी गणेश हा हलत्या देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन करीत असतो. यंदा त्यांने जागरण गोंधळ या लोककलेचे चित्रण उत्कृष्टरीत्या आरासीच्या (देखावा) माध्यमातून मांडले आहे. त्याची आरास पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.

जिजाऊ माता आणि सावित्रीबाई फुलेंच्या रुपात महालक्ष्मीची स्थापना -

छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील फक्त सह्याद्री परिवाराच्यावतीने माॅसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रुपात महालक्ष्मीची उभारणी केली आहे. गेल्या १८ वर्षापासून हा परिवार पुस्तकरूपी आरास उभी करुन पुस्तके वाचण्याचा संदेश देतोय. यंदाच्या वर्षी देखील या परिवारातील शारदा शिंदे, धनश्री शिंदे यांनी जिजाऊ ना सिंहासनावर तर सावित्रीबाई फुले यांना उभ्या स्वरुपात ठेवण्यात आल्या असून त्यासमोर कसलीही विद्युत रोषणाई, फुलांची सजावट न करता ३०० हून अधिक पुस्तकांची आरास ठेवली आहे.

धर्म समभाव ही भावना वाढीस नेण्यासाठी गौरी-गणपती -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत मुस्लिम समाजाच्या मावळ्यांनी देखील मोठा हातभार लावला होता. सर्व धर्म समभाव ही भावना वाढीस नेण्याच्या हेतूने आम्ही घरी गौरी व गणपतीची स्थापना करीत आलो आहोत. सबका मालीक एक हैं, असे उंदरगाव येथील अहमद सय्यद सांगतात.

हेही वाचा - जळगावातील नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीची आहे सर्वदूर ख्याती; 75 वर्षांचा लाभलाय मंदिराला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.