ETV Bharat / state

पवित्र धार्मिक ग्रंथ कुराणचा संस्कृत भाषेत अनुवाद; 22 एप्रिलला अक्कलकोटला लोकार्पण सोहळा

author img

By

Published : Apr 20, 2022, 5:03 PM IST

translation of holy quran in sanskrit language
पवित्र धार्मिक ग्रंथ कुराणचा संस्कृत भाषेत अनुवाद

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे मूळचे सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी गावचे. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्कृतचे शिक्षण घेतले होते. मुंबईच्या मराठा मंदिर संस्थेच्या शाळेत संस्कृत शिक्षक म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ सेवा केली होती. त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढीही संस्कृत भाषेच्या प्रेमात रमली आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका आजही संस्कृत भाषेत छापल्या जातात.

सोलापूर - कुराण या पवित्र धर्मग्रंथाचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. पण संस्कृत भाषेत प्रथमच अनुवाद झाला आहे. दिवंगत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी इस्लामचा पवित्र कुराण ग्रंथाचा संस्कृत भाषेत भावानुवाद किंवा अनुवाद केला आहे. या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा अक्कलकोटमध्ये येत्या २२ एप्रिलला होणार आहे. कुराणाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. परंतु संस्कृत भाषेत कुराणाचा भावानुवाद किंवा अनुवाद प्रथमच पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी केला आहे. अलीकडे देशातील जातीयता गढूळ होत चालली आहे. या ना त्या कारणाने एकमेकांच्या जातींवर चिखलफेक केली जाते. मात्र मुस्लिम धर्मीय पवित्र कुराण ग्रंथ देवभाषा असलेल्या संस्कृत भाषेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न सोलापुरातुन होत आहे.

दोन राष्ट्रपतींकडून पंडित गुलाम दस्तगीर यांचा सन्मान - अक्कलकोट येथील पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी संस्कृत भाषेत विविध १६ ग्रंथ लिहिले आहेत. तसेच इतर भाषांतील संस्कृत अनुवादाचे सात ग्रंथही त्यांच्या नावावर नोंद आहेत. जन्माने मुस्लीम धर्मीय असले तरी त्यांनी संस्कृत भाषा व साहित्य क्षेत्रात सुमारे सहा दशके केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय तत्कालीन राष्ट्रपती के. नारायणन यांनीही त्यांना राष्ट्रीय पंडित पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले होते.

पंडित गुलाम दस्तगीर यांच्या कुटुंबाने संस्कृतसाठी वाहून घेतलं-
पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे मूळचे सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी गावचे. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्कृतचे शिक्षण घेतले होते. मुंबईच्या मराठा मंदिर संस्थेच्या शाळेत संस्कृत शिक्षक म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ सेवा केली होती. त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढीही संस्कृत भाषेच्या प्रेमात रमली आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका आजही संस्कृत भाषेत छापल्या जातात.

कवी बदीऊजमा बिराजदार यांची पितृऋण फेडण्याची धडपड-
पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे गेल्या वर्षी २२ एप्रिल 2020 ला वयाच्या ८७ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले होते. त्यापूर्वी त्यांनी कुराण ग्रंथाचा संस्कृतमध्ये भावानुवाद म्हणजेच अनुवाद हाती घेऊन पूर्ण केले होते. त्यासाठी त्यांनी देशभरातील काही विद्वान मौलाना, मुफ्तींशी चर्चा केली होती. पूर्ण केलेल्या संस्कृत कुराण ग्रंथाचा लोकार्पण सोहळा मुंबईत राजभवनावर करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु ग्रंथाचे मुद्रण व छपाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र कवी बदिउज्जमा बिराजदार यांनी वडिलांचे अपूर्ण राहिलेले हे काम पूर्ण करून पितृऋण फेडण्याचा धडपड करत आहेत.

अक्कलकोट येथील एका दर्ग्यामध्ये लोकार्पण सोहळा -
सोलापूरच्या शिवप्रज्ञा प्रकाशन संस्थेने ‘सरल-सुलभ-सुबोध : संस्कृत कुराण ‘ ग्रंथाच्या मुद्रण आणि छपाई पूर्ण केली आहे. जागतिक ठेवा असलेला हा ग्रंथ ९३६ पानांचा आहे. अक्कलकोटच्या बऱ्हाणपूर येथील हजरत ख्वाजा मखदूम अल्लाउद्दीन चिश्ती दर्गाहचे सज्जादे नशीन सय्यद शाह मुजाहिद साजीद हुसेन चिश्ती जहागीरदार यांच्या हस्ते होणार आहे. या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा रमजान महिना आणि पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून २२ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता अक्कलकोट येथील हजरत ख्वाजा गुलाबसाहेब दर्गाहमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सोलापुरातील सर्व समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.