ETV Bharat / state

सिंधुदुर्ग : स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत त्याने भलत्यालाच जाळले, कहाणीत मोठा ट्विस्ट

author img

By

Published : Aug 25, 2021, 7:37 AM IST

Sindhudurg
Sindhudurg

कणकवली तालुक्यातील असलदे गावात शैलेश तांबेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र आता त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून भलत्याच व्यक्तिला जाळले असल्याचे समोर आले आहे. या कहाणीत मोठा ट्विस्ट आहे. वाचा सविस्तर...

सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी कणकवली तालुक्यातील असलदे गावात शैलेश तांबे नावाच्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र आता कोकण रेल्वेचा कर्मचारी असलेल्या शैलेशने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून भलत्याच व्यक्तीला जाळले असल्याचे समोर आले आहे. सोमवारी वैभववाडी पोलिसात हजर होत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय घडली होती घटना?

कणकवली तालुक्यातील असलदे गावातील कोकण रेल्वेत कर्मचारी असलेला शैलेश तांबे गायब झाला. लगतच्या कोळोशी गावातच शेत मांगरात अज्ञात व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. त्या मृतदेहाशेजारी गायब झालेल्या कोकण रेल्वे कर्मचारी शैलेश तांबे याची ओळख दाखवणारी काही कागदपत्रे आणि कपडेही सापडले. त्यावरून माहेरी गेलेल्या शैलेशच्या पत्नीने घटनास्थळी जात हे प्रेत आपल्याच नवऱ्याचे असल्याची ओळख पटवली. मृतदेह सापडल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंदही झाली. मृतदेहाची ओळख पटल्यामुळे तो मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले. ही घटना 2 ऑगस्ट 2021 रोजी घडली. पण अचानक मृत म्हणून पोलीस ठाण्यात नोंद असलेला कोकण रेल्वे कर्मचारी शैलेश तांबे हा स्वतःला मारहाण झाली अशी तक्रार देण्यासाठी वैभववाडी पोलीस ठाण्यात 23 ऑगस्ट रोजी दाखल झाला. तेव्हा पोलिसच अवाक झाले.

सुरवातीला 4 व्यक्तींनी मारल्याचा बनाव

मला 4 अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली, अशी तक्रार देण्यासाठी डोके फुटलेल्या, रक्तबंबाळ अवस्थेत शैलेश तांबे वैभववाडी पोलीस ठाण्यात गेला. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी शैलेशला खाकी भाषेत विचारले. तेव्हा शैलेशला मारहाण झाली नसून त्याने स्वतःलाच दगड मारून घेतल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. जखमी शैलेशला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, त्याला वैभववाडी रुग्णालयातून पुढे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

कहाणीत मोठा ट्विस्ट

शैलेश तांबे हा कोकण रेल्वेत अनुकंपा खाली नोकरीस लागला. मात्र काही लाखांचे असलेले कर्ज न फेडता येत असल्याने कर्जबाजारी शैलेश वैतागला होता. कर्जदारांच्या ससेमिऱ्यातून सुटण्यासाठी शैलेशने फिल्मी स्टाईलने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. आज स्वतःला मारहाण झाल्याचे भासवत पोलीस ठाण्यात हजरही झाला. मात्र खरा प्रश्न आहे तो जळीत मृतदेहाचा. विशेष म्हणजे त्याच्या या बनावामागे गृहकलहाचे नाजूक कारणही असल्याचे समोर आले आहे.

मग तो मृतदेह कोणाचा?

कोळोशीत शैलेशच्या नातेवाईकांच्या शेत मांगरात सापडलेला तो मृतदेह कोणाचा? तो मृतदेह जळालेल्या अवस्थेत कसा? घटनास्थळी मृत व्यक्ती आली कशी? नेमका कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला? मृत्यू नैसर्गिक होता की घातपात? घातपात होता तर नेमका त्याचा खून कोणी केला? खुनाचा उद्देश काय? 3 ऑगस्टपासून 23 ऑगस्टपर्यंत शैलेश तांबे कुठे होता? या दिवसात त्याने काय केले? या प्रश्नांची उत्तरे आता कणकवली पोलिसांना शोधावी लागणार आहेत. डोके हलवून टाकणाऱ्या या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी डॉ.नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे व त्यांची टीम करत आहे. दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीला आपण आपल्या मृत्यूचा बनाव रचून जळल्याची कबुली शैलेश तांबे याने पोलिसांना दिली असल्याचे समजत आहे.

हेही वाचा - प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करणारा प्रियकर गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.