ETV Bharat / state

'देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा'

author img

By

Published : May 2, 2020, 12:57 PM IST

MLA Nitesh Rane
आमदार नितेश राणे

जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर पोलीस ठाण्यात निवेदन देत सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामी करणारी व त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारी मोहीम चालवली जात आहे. या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करा, अशी मागणी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना पत्र देऊन केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर पोलीस ठाण्यात निवेदन देत सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. वैभववाडीत भाजपाध्यक्ष नासीर काझी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी माजी सभापती अरविंद रावराणे, बाळा हरयाण, नगरसेवक संजय सावंत आदी उपस्थित होते.

वेंगुर्ले भाजपच्या वतीने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर व शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.

कणकवलीत तालुका भाजप अध्यक्ष संतोष कानडे व राजन चिके यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन फडणवीस यांच्यावर विखारी टिप्पन्नी करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

कोरोनोच्या संकटामुळे आज महाराष्ट्रासह देश अडचणीत आला आहे. या संकटाचा सामना आज सर्वच जण एकत्रितपणे करत आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीला सामाजिक माध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टीका केली जात आहे. घाणेरडी, अश्लिल व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. काही भाड्याच्या एजन्सी व काही विकृत मानसिकता असणारे हा गलिच्छ प्रकार करित आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यात यावी व फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या दीपक बोचे या व इतर समाजकंटकाविरुध्द गुन्हे दाखल करुन अटक करण्यात यावी, अशी मागणी या सर्व निवेदनातून करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.