ETV Bharat / state

सिंधुदुर्गात जखमी मास्क्ड बुबी या महासागरी पक्षाला जीवदान

author img

By

Published : Aug 7, 2020, 11:22 AM IST

Masked booby rescued by youth in sindhudurg
Masked booby rescued by youth in sindhudurg

मास्क्ड बुबीला मोठा समुद्रकावळाही म्हणतात. सुलीफॉर्मेस वर्गातील सुलीडे कुळातील एक पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये मास्क्ड बूबी तर हिंदीमध्ये जलकौवा, पानकौवा म्हणतात. हा पक्षी आकाराने राजहंसापेक्षा मोठा आहे. प्रामुख्याने शुभ्रवर्णाचा, पंखाची किनार काळी, पिवळी, नारिंगी किंवा निळसर असते. तोंड आणि कंठावरील उघड्या कातडीचा रंग काळा-निळा असतो

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील सावंतवाडी माजगाव येथे महासागरी पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. त्याने खाद्य पकडण्यासाठी आकाशातून खाली सूर मारला असावा आणि तो जखमी झाला असावा, असा अंदाज वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केला आहे. मास्क्ड बुबी असे त्या पक्षाचे नाव आहे. तो बदकासारखा दिसतो. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर येथील युवकांनी त्याला वाचवण्यासाठी अधिक उपचाराच्या हेतूने वनविभागाच्या ताब्यात दिले.

मास्क्ड बुबीला मोठा समुद्रकावळाही म्हणतात. सुलीफॉर्मेस वर्गातील सुलीडे कुळातील एक पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये मास्क्ड बूबी तर हिंदीमध्ये जलकौवा, पानकौवा म्हणतात. हा पक्षी आकाराने राजहंसापेक्षा मोठा आहे. प्रामुख्याने शुभ्रवर्णाचा, पंखाची किनार काळी, पिवळी, नारिंगी किंवा निळसर असते. तोंड आणि कंठावरील उघड्या कातडीचा रंग काळा-निळा असतो. भारतातामध्ये हा पक्षी विणीनंतर पाकिस्तानच्या किनार पट्टीवर, तसेच वर्षा-ऋतूतील वादळातून भारताचा पश्चिम किनारा आणि श्रीलंकेपर्यंत येतात तसेच मालदीव बेटावरही आढळतात.

येथील माजगाव परिसरात नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी डी. के. टुरीझम हाॅलसमोर असलेल्या शेतात हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला होता. प्रथम दर्शनी तो बदक असल्याचा अंदाज तेथील युवकांना आला. मात्र त्याची चोच व शरीरावरील खाणाखुणा लक्षात घेता तो अन्य कोणतातरी पक्षी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या पक्षाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान याबाबतची माहिती वन अधिकारी पुराणिक यांना विचारले असता ते म्हणाले, या पक्षाचे नाव ‘मास्क्ड बुबी’ असे आहे. महासागरी पक्षी म्हणून हा गणला जातो. हवेत उंच ठिकाणी उडतो. लक्षद्वीप आणि मालद्वीप या ठिकाणी त्यांची पैदास होते. तो याठिकाणी चुकून आला असण्याची शक्यता आहे. लहानपणी त्याच्या गळ्यात तपकिरी रंग असतो, अशा बाहेरून येणाऱ्या पक्षावर विषाणू असतात. त्यामुळे अशा पक्षाला हाताळताना योग्य ती काळजी घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले आहे. दरम्यान या ठिकाणी हा पक्षी वनविभागाच्या ताब्यात देणाऱ्या युवकांचे त्यांनी स्वागत केले आहे. सचिन मोरजकर, शुभम मोरजकर, अविनाश पडते, मृणाल पावसकर, पवन सावंत आदींनी सहकार्य केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थलांतरित पक्षी येण्याचे प्रमाण मोठे आहे. येथील स्वच्छ समुद्र किनारे, पाणथळ जागा आणि येथील विविधांगी वनसंपदा या पक्षांसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे असे पक्षी विविध हंगामात मोठ्या प्रमाणावर येतात. येथील लोकांमध्येही आता या पक्षांबाबत जागरूकता निर्माण झाली असून या पक्षांच्या संवर्धनासाठी अनेक लोक आता समोर येत आहेत. हे विशेष आहे, असे यावेळी वनअधिकारी सुभाष पुराणिक यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.