ETV Bharat / state

...तर शिवसेनेला जनता अडगळीत टाकेल, भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांचा इशारा

author img

By

Published : Oct 22, 2020, 6:17 PM IST

आडाळी येथील वनौषधी संशोधन प्रकल्पाची फाईल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आपणाकडेच दाबून ठेवली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीलाही ते आले नसल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी सांगितले.

Pramod Jathar
भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार

सिंधुदुर्ग - आडाळी येथील वनौषधी संशोधन प्रकल्पाची फाईल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आपणाकडेच दाबून ठेवली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीलाही ते आले नाहीत की वनौषधी प्रकल्पाची फाईल आणली नाही. त्यामुळे आडाळीत प्रकल्प आणणारच अशा पोकळ बढाया शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मारू नयेत. आडाळीत वनौषधी प्रकल्प न झाल्यास इथली जनताच शिवसेनेला अडगळीत टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी केली.

यावेळी बोलताना प्रमोद जठार म्हणाले, शिवसेनेच्या आमदार, खासदारच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प लातूरला नेण्यासाठी आग्रही आहेत. मंगळवारी (ता.२०) होणार्‍या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत आडाळीतील वनौषधी संशोधन प्रकल्पाला चालना मिळेल अशा बाता शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मारल्या होत्या. वनौषधी प्रकल्प हलवला तर आंदोलन करून, आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही अशाही वल्गना शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पालकमंत्री करत होते. प्रत्यक्षात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या सर्वांना धूप घातलेला नाही, असेही ते म्हणाले. ते कणकवली येथे बोलत होते.

देशमुखांच्या खात्यातील एक अधिकारी कोहली यांना मी महीनाभरापुर्वी भेटून प्रकल्प लातूरला नेऊ नका तो सिंधुदुर्गसाठी आम्ही मंजूर करून आणलेला आहे असे ठणकावले. तेव्हा त्याने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. हा प्रकल्प तुमच्यासाठी नाही कोकणासाठी हर्बल गार्डनचा प्रकल्प आहे. मी जास्तच आरडाओरडा केल्यावर ते महाशय म्हणाले मग तुम्ही केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक यांचे थेट पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना आणा, तरच आमचे मंत्री देशमुख ऐकतील. मी त्याचे आव्हान स्वीकारले आणि ताबडतोब श्रीपाद नाईक यांना फोन केला, ते म्हणाले हरकत नाही, मी नाईक यांचे पत्र घेतले आणि सदर पत्र त्या अधिकार्‍याला दुसर्‍या दिवशी पाठवले. तेव्हा तो वठणीवर आला, असेही जठार यांनी सांगितले.

आता मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्री विनंती करतात, तेव्हा रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलावून मुख्यमंत्र्यांमार्फत कॅबिनेट मंत्र्यांना निर्देश देवून तातडीने प्रकल्पाला जागा आडाळीत देण्याचे आदेश सर्व मंत्री व खात्यांना द्यायला हवे होते. तसे झाले असते तर आम्ही खासदारांना मानले असते. परंतु खासदारांना ना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला ना अमित देशमुखांनी. एवढेच नव्हे तर तिकडे अमित देशमुख यांनी वनौषधी संशोधन प्रकल्पाची फाईलच दाबून ठेवली आहे. ते कॅबिनेट बैठकीलाही गेलेले नाहीत. रेल्वेने पाणी न्यावे लागले तरी चालेल पण प्रकल्प लातूरलाच नेणार असा त्यांचा आग्रह आहे. तेव्हा आता खासदार राऊत, तुमचे सोडा तुमच्या मुख्यमंत्र्यांचेसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री ऐकत नाहीत हे मान्य करा. तसेच वनौषधी प्रकल्पाला लवकरात लवकर जागा आडाळीत मिळाली नाही तर तुमची सेना आणि तुम्ही मात्र कोकणात अडगळीत जाल हे ध्यानात ठेवा, असा इशारा जठार यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.