ETV Bharat / state

Satara Crime : पर्यटनस्थळांवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सातशे फूट दरीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 17, 2023, 4:21 PM IST

साताऱ्यातील पर्यटनस्थळी मोठी दुर्घटना घडली आहे. धबधब्याच्या कड्यावरून सातशे फूट खोल दरीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पर्यटनस्थळांवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Two Youths Died
दरीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू

सातारा : जावली तालुक्यातील पर्यटनस्थळी मोठी दुर्घटना घडली आहे. प्रसिध्द एकीव धबधब्याच्या कड्यावरून सातशे फूट खोल दरीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने अंधार आणि भर पावसात शोध मोहिम राबवून, रात्री उशीरा दोघांचेही मृतदेह दरीतून वर काढले. अक्षय शामराव आंबवणे (रा. बसप्पाचीवाडी, ता. सातारा) आणि गणेश फडतरे (रा. करंजे, सातारा), अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



हुल्लडबाजी जीवावर बेतली : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे पश्चिम भागातील धबधबे प्रवाहीत झाले आहेत. पावसामुळे सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली, पाटण या तालुक्यातील पर्यटनस्थळे गजबजली आहेत. परंतु, पर्यटनस्थळांवर पर्यटक हुल्लडबाजी करत आहेत. जावली तालुक्यातील सर्वात उंच आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या, एकीव धबधब्यावरील हुल्लडबाजी दोन तरूणांच्या जीवावर बेतली आहे. धबधबा पाहायला गेलेल्या चौघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. वाद सुरू असतानाच अभय आंबवणे आणि गणेश फडतरे यांचा धबधब्याच्या कड्यावरून सातशे फूट खोल दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला.


पोलीस आणि ट्रेकर्सनी मृतदेह बाहेर काढले : स्थानिक नागरीकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, सातारा ग्रामीण आणि मेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवेंद्रराजे ट्रेकर्स टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने अंधार आणि भर पावसात स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. दरीत उतरून ट्रेकर्सनी दोन्ही तरूणांचे मृतदेह रात्री उशीरा बाहेर काढले. दरीत पडल्याने गंभीर जखमी होऊन दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सातार्‍यावर शोककळा पसरली.



धबधब्यांवर सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज : दरीत पडून मृत्यू झालेल्या दोघांपैकी अक्षय आंबवणे हा होमगार्ड होता, तर गणेश हा विवाहित असून मार्केट कमिटीत कामाला होता. दोघांच्या मृत्यूने पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळांवर गर्दी वाढते. पर्यटकांकडून हुल्लडबाजी केली जाते. त्यात अनेकदा दुर्घटना घडतात आणि पर्यटकांना जीव गमवावा लागतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

हेही वाचा -

  1. Four Youths Drowned : वाढदिवसाची पिकनिक बेतली जीवावर; धबधब्याच्या कुंडात चार तरुणांचा बुडून मृत्यू
  2. मावळमधील वर्षाविहार पडला भारी, धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन मुलांसह बापाचा मृत्यू
  3. जळगावातील 2 तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू; वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते सातपुडा पर्वतरांगांवर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.