Star Tortoise in Karad: भरवस्तीत सापडले 'स्टार' कासव; वन विभागाने सुरू केला तपास

Star Tortoise in Karad: भरवस्तीत सापडले 'स्टार' कासव; वन विभागाने सुरू केला तपास
Star Tortoise in Karad मानद वन्यजीव रक्षकाला कराड शहरातील घर वस्तीत संरक्षित वर्गात समावेश असलेले दुर्मिळ स्टार कासव सापडले आहे. घरासाठी शुभ आणि पैशांचा पाऊस पाडणारा प्राणी म्हणून घरात छुप्या पद्धतीने हे कासव पाळले जाते. या कासवाच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात आली आहे.
सातारा (कराड) Star Tortoise in Karad :वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित वर्गात समावेश असलेले दुर्मिळ प्रजातीचे स्टार कासव मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कराडमधील भरवस्तीत सापडले आहे. हे कासव लहानपणापासून घरात पाळले असल्याचा आणि जाणुनबुजून सोडले असल्याचा वन विभागाला संशय आहे. त्यादृष्टीने वन विभाग तपास करत आहे.
कासवाला लवकरच अधिवासात सोडणार मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना हे कासव बेवारस स्थितीत काझी वाडा, रविवार पेठ परिसरात सापडले आहे. या कासवाबद्दल माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक कैलास सानप यांनी हे कासव ताब्यात घेतले आहे. उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज यांनी वरिष्ठांशी केलेल्या चर्चेनंतर स्टार कासवाचे लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
स्टार कासवाची सर्वाधिक तस्करी- जगभरात कासवांच्या अनेक प्रजाती आहेत. काही दुर्मीळ कासवांची अंधश्रद्धेपोटी तसेच औषधे, धार्मिक विधी करणे, या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. स्टार कासव हा भारतातील सर्वाधिक तस्करी होणारा आणि वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित वर्गातील प्राणी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीत या कासवाला संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
शिकार आणि विक्री हा आंतरराष्ट्रीय गुन्हा - स्टार कासव पाळणे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार प्रतिबंधीत आहे. स्टार कासव ही प्रजाती वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार शेडूल 1 भाग क मध्ये समाविष्ट असून याची विक्री करणे, पाळणे,शिकार करणे याला कायद्यात 10 हजार रूपये दंड व 7 वर्ष कारावास, अशी शिक्षेची तरतूद आहे. घरासाठी शुभ आणि पैशांचा पाऊस पाडणारा प्राणी म्हणून घरात छुप्या पद्धतीने हे कासव पाळले जाते. स्टार कासवाच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीयस्तरावर बंदी जाहीर करण्यात आली आहे.
दुर्मिळ प्रजातीचं सुंदर कासव- भारतीय स्टार कासव ही एक दुर्मीळ प्रजाती असून या प्रजातीच्या कासवास कोरडे, रेताड आणि खडकाळ हवामान लागते. गवत, फळे, फुले आणि झाडांची पाने हा त्यांचा आहार असतो. स्टार कासव ही प्रजात गुजरातमधील कच्छ, राजस्थान, ओडीसा आणि मध्य महाराष्ट्रात आढळते. स्टार कासवाच्या पाठीवर पिवळ्या आणि काळ्या रंगाची सुंदर नक्षीदार आकृती असते. हे चित्र एका पिरॅमिडसारखं दिसतं. त्याचं सौंदर्य पाहूनही काही लोक या कासवांची तस्करी करतात.
हेही वाचा-
