Satara Crime News: तीन राज्यात घरफोड्या करणारी केटीएम गॅंग जेरबंद; गुजरातमध्ये गहाण ठेवलेले १०३ तोळे सोने, ६ किलो चांदी हस्तगत

Satara Crime News: तीन राज्यात घरफोड्या करणारी केटीएम गॅंग जेरबंद; गुजरातमध्ये गहाण ठेवलेले १०३ तोळे सोने, ६ किलो चांदी हस्तगत
Satara Crime News : तीन राज्यात घरफोड्या करणाऱ्या वॉन्टेड आंतरराज्य केटीएम टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं (KTM Gang Arrested) आहे. तीन वर्षांपासून ही टोळी वॉन्टेड होती. या टोळीकडून २७ घरफोडीचे २७ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुजरातमधील सोनारांकडे गहाण ठेवलेले १०३ तोळे सोन्याचे दागिने आणि ६ किलो चांदी, असा ७० लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सातारा Satara Crime News : घरफोडींच्या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या पुण्यातील आंतरराज्य केटीएम टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद (KTM Gang Arrested) केली आहे. या टोळीकडून २७ घरफोडीचे २७ गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी तीन चोरट्यांसह चोरीचा मुद्देमाल गहाण ठेऊन घेणारे तीन सोनार आणि मुद्देमाल गहाण ठेवण्यास मदत करणारे दोघे, अशा ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
घरफोड्या करून धूम स्टाईलने पळून जायचे : सातारा जिल्ह्यातील मेढा, मल्हारपेठ, वाई, सातारा तालुका, बोरगाव, खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाई, वाठार, उंब्रज, वडुज भागामध्ये तीन केटीएम मोटरसायकलवरून ६ ते ७ जण यायचे आणि घरफोड्या करुन धूम स्टाईलने पळून जायचे. या टोळीला पकडण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिले होते.
तीन राज्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे : केटीएम गँगने महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तसेच कर्नाटक आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात घरफोड्या आणि चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळं या आंतरराज्य टोळीला पकडण्याचं मोठं आव्हान सातारा जिल्हा पोलीस दलासमोर होतं. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली खास तपास पथके तयार केली.
तीन महिने टोळीच्या हालचालींवर पाळत : एकाच रात्रीत ८ ते १० बंद घरांमध्ये चोरी करून धूम स्टाईलने ही टोळी पळून जात होती. घरफोडी आणि चोरी करण्याच्या पद्धतीचा पोलिसांनी अभ्यास केला. पोलिसांचा खबऱ्या सलग ३ महिने पुणे, पौड, यवत, मुळशी परिसरात केटीएम टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवून सातारा पोलिसांना माहिती देत होता.
मुळशी परिसरात सापळा रचून पकडले : केटीएम गँगमधील ३ जण पौड परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रविंद्र भोरे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांच्या पथकाने पौड (ता. मुळशी, जि. पुणे) येथील डोंगरी भागात सापळा लावून सुरदेव सिलोन नानावत, परदुम सिलोन नानावत (रा. घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे) आणि राम धारा बिरावत (रा. करमोळी, ता. मुळशी जि. पुणे) यांना पकडलं.
गहाण ठेवलेला मुद्देमाल हस्तगत : मार्च २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत घरफोड्या करुन सोन्या, चांदीचे दागिणे व रोख रकम चोरल्याची कबुली संशयितांनी दिली. तसेच चोरीचा मुद्देमाल अहमदाबाद (गुजरात) येथील महिला सोनार तसेच सोनपालसिंग नारायणसिंग रजपूत व प्रदीप आसनदास खटवानी यांना विकल्याचं सांगितलं. पोलिसांच्या एका पथकानं अहमदाबादला जाऊन महिला सोनार आणि प्रदीप आसनदास खटवानी यांना ताब्यात घेऊन अटक केली.
चोरट्यांना मदत करणाऱ्यास अटक : वामन नंदू राठोड (रा. फंडवस्ती-रांजनगाव, जि. पुणे), वाल्मीक रामभाऊ शेखावत (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) हे आरोपींच्या नेहमी संपर्कात होते. आरोपींना ताब्यात घेतल्यापासून वामन राठोड हा गुजरातला पळून गेला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. चोरीचा मुद्देमाल आपल्या मदतीने गुजरातमधील सोनारांकडे गहाण ठेवला होता, अशी कबुली राठोड याने दिली आहे.
११५ गुन्ह्यांची उकल, ३३८ तोळे सोने हस्तगत : नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, असे एकुण ११५ मालमत्तेचे गुन्हे सातारा जिल्हा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले दागिन्यांपैकी नमुद गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ३ किलो ३८० ग्रॅम (३३८ तोळे सोने), ४ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दगिने (६ किलो), असा २ कोटी ६ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
हेही वाचा -
