ETV Bharat / state

राम मंदिर प्रतिष्ठापना हा धार्मिक कार्यक्रम की राजकीय? पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींना सवाल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 7:41 PM IST

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on Ram Mandir : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम धार्मिक आहे की राजकीय? असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद

सातारा Prithviraj Chavan on Ram Mandir : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना, घराणेशाही, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मंदिर उभारणीचं काम पूर्ण होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागणार असताना निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठापनेची घाई केली का? हा धार्मिक कार्यक्रम आहे की राजकीय? असे थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सातार्‍यात माध्यमांशी बोलताना केलं आहे.

मोदींच्या व्यासपीठावरच घराणेशाही : घराणेशाहीच्या आरोपावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बोलणं सोपं असलं, तरी मोदींच्या व्यापसीठावर घराणेशाही असलेले किती लोक बसले आहेत, ते त्यांनी पाहावं. अनुराग ठाकूर कोण आहेत? अमित शाहांची मुलं कशी अ‍ॅडजस्ट झाली. महाराष्ट्रात बाप-लेकांच्या प्रतिनिधीत्वाची किती तरी उदाहरणे आहेत. घराणेशाहीचं नाव घेऊन फक्त गांधी घराण्याला टार्गेट करण्याशिवाय मोदी काही करत नाहीत. परंतु, त्यांचं कर्तृत्व, बलिदान पाहा. इंदिरा गांधी, राजीव गांधींचं बलिदान मोदी विसरले का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

राष्ट्रपती, शंकराचार्यांना निमंत्रण का नाही? : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या अधिकारानं राम मंदिर प्रतिष्ठापना करताहेत, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. राष्ट्रपतींना का बोलावलं नाही. त्या विशिष्ट समाजाच्या आहेत म्हणून का? असे अनेक प्रश्न आहेत. मंदिर अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठापना करणं चुकीचं असल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे. आता काय करायचं ते मोदी ठरवतील, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

निवडणुकीसाठीच राम मंदिराचा मुद्दा : मोदी सरकार 2014 ला सत्तेवर आलं. त्यावेळी अच्छे दिन आणणार, काळा पैसा बाहेर काढणार, दोन कोटी रोजगार देणार, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशा घोषणा केल्या. मात्र, नोटबंदी, जीएसटीमुळे त्यांचा तो कार्यक्रम सपशेल फेल गेला. पुढच्या पाच वर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा काढला. मोदी है तो मुमकीन है, छप्पन इचं छाती वगैरे सगळं केलं. त्यानंतर पुलवामा हल्ला झाला. पुलवामा संदर्भात जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल बोलले. परंतु, त्याचे विश्लेषण करायला कोणी तयार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

राष्ष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा फेल : चीननं आक्रमण करून भारताचे वीस सैनिक मारले. भारतीय हद्दीत छावण्या उभारल्या. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. संसदेत कोणीही घुसतंय. त्यामुळे मोदींचा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही फेल गेला. म्हणूनच आता राम मंदिराचा मुद्दा काढला असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला लगावला आहे.

हेही वाचा -

  1. मिलिंद देवरांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; खासदारकी लढवण्याचे दिले संकेत
  2. मिलिंद देवरांची पत्नी पूजा शेट्टीचं बॉलिवूडसोबत आहे अनोखं नातं; जाणून घ्या लव्हस्टोरी
  3. मिलिंद देवरांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींवर आरोप, 'हा' केला मोठा दावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.