ETV Bharat / state

'खासदार-आमदारांना आडवा', मराठा आरक्षणावरून उदयनराजे भडकले

author img

By

Published : May 7, 2021, 5:50 PM IST

Updated : May 7, 2021, 7:46 PM IST

sarara
सातारा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा बांधव संतापले आहेत. 'मराठा आरक्षण प्रकरणी आता खासदार-आमदारांना आडवा. त्यांना जाब विचारा', असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

सातारा - 'मराठा आरक्षण प्रश्‍नी खासदार, आमदारांना आडवा. त्यांना जाब विचारा, त्यांच्याकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही. त्यांना मतदारसंघात फिरू देऊ नका', अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (7 मे) मराठा आरक्षणावरून टीकेची तोफ डागली.

खासदार उदयनराजे भोसले

'निकाल कोणालाच मान्य नाही'

"मराठा आरक्षणाचा निकाल 5 तारखेला जाहीर करण्यात आला. वाटेल त्या परिस्थितीत कुणालाही हा निकाल मान्य नाही. इतर समाजाला आरक्षण दिले गेले. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला का? गायकवाड समितीने मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल दिला असतानाही सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही असा निकाल दिला. शासन अद्याप खुलासा का करत नाही? आमचे मित्र अशोक चव्हाण म्हणतात पेपर आल्यानंतर अभ्यास करून त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल. मात्र, ते काहीही म्हणत असले तरी मराठा समाजावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठी युवकांचे आयुष्य अंधारमय झाले आहे. न्यायालयाचा निकाल कोणालाच मान्य नाही", असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

'...तर खपवून घेणार नाही'

'मराठा समाजाला सोडून अन्य समाजांना आरक्षण दिले जाते. मात्र मराठ्यांना कोण बाजूला करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मराठा आरक्षण प्रश्नी नेमलेला वकील न्यायालयात हजर राहत नाही. न्यायालयात आरक्षणाची माहिती वेळेवर दिली जात नाही. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा हा एक डाव आहे. यांच्यापेक्षा जनावरे परवडली', अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपला उद्वेग व्यक्त केला.

'जनताच लोकप्रतिनिधींची मस्ती उतरवेल'

'यापूर्वी समाजामुळे आपण लोकप्रतिनिधी आहोत असे सगळ्यांना वाटत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. माझ्यामुळे समाज आहे, अशी धारणा झाल्यामुळे जनताच लोकप्रतिनिधींची मस्ती उतरवेल', असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.

'जिल्ह्यात १७ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणार'

कोरोना परिस्थितीवरही उदयनराजे बोलले. 'आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. खासदार निधीच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांटसाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात १७ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी १२ प्लांटला मान्यता मिळाली आहे', असे यावेळी उदयनराजे म्हणाले.

'मोकळ्या इमारती आयसोलेशनसाठी घ्या'

'जगात वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहेत. त्यापैकीच कोरोना हा एक व्हायरस आहे. देशातील वैज्ञानिकांनी एकत्र येऊन रेमडेसिवीर इंजेक्शनच्या दुष्परिणामांची माहिती देण्याची गरज आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मोकळ्या इमारतींचा आयसोलेशनसाठी वापर करण्यात यावा, अशा सूचनाही आपण केलेल्या आहेत', अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.

हेही वाचा - ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन

हेही वाचा - अकलूज येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

Last Updated :May 7, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.