सातारा - इन्स्टाग्रामवर एका युवतीने एअरफोर्समधील जवानाशी प्रथम ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याला हनी ट्रॅपमध्ये ( Honey Trap ) अडकवण्यात आले. हनी ट्रॅपमध्ये फसलेल्या या जवानाकडून 64 हजार रूपयांची खंडणी उकळत त्याच्यावर चाकूने वार करून जखमी करण्यात आले. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ( Satara Crime Branch ) पुण्यातील एका युवतीसह चौघांना अटक केली आहे. निशू मीना (वय 21, रा. गुना- मध्य प्रदेश), रामकुमार आईदानराम बिष्णोई (वय 23), दिनेश मोहनलाल बिष्णोई (वय 20, रा. जोधपूर-राजस्थान), लक्ष्मीलाल सरदारजी मीना (रा. जि. उदयपूर-राजस्थान, हल्ली रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्यादी हा मूळचा राजस्थानमधील आहे. तो पंजाब एअरफोर्समध्ये कार्यरत आहे.
सातारा रेल्वे स्थानकावर भेटायला बोलावले - एअरफोर्समधील जवानाशी पुण्यातील युवतीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि त्या युवतीने शनिवारी (दि. 2 जुलै) त्याला सातारा रेल्वे स्थानकावर भेटायला बोलावले. येथे आल्यानंतर युवतीने त्याला ओमनी कारमध्ये बसायला सांगितले. त्यावेळी कारमध्ये तीन जण होते. फिर्यादी गाडीत बसल्यानंतर आपला विनयभंग केल्याचा कांगावा युवतीने सुरू केला. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकाराने गोंधळून गेलेल्या फिर्यादीने 64 हजार रूपये ट्रान्सफर केले. मात्र, आणखी पैशासाठी आरोपी त्याच्याशी झटापट करू लागले. त्याने प्रतिकार करताच एका आरोपीने चाकूने त्याच्यावर दोन वार केले. तरीही तो प्रतिकार करू लागल्याने एकाने पिस्तुल दाखवले. त्याचवेळी संशयितांनी त्याच्या खिशातील 2500 रूपये आणि दोन्ही मोबाईल काढून घेतले.
12 तासात गुन्ह्याचा छडा - अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे गांगरून गेलेल्या जवानाने सातारा शहर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. तपासामध्ये संशयित हे रहिमतपूर (ता. कोरगाव) परिसरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेला चाकू, पिस्टलसारखा दिसणारा लायटर, जबरदस्तीने घेतलेला मोबाईल व रोख रक्कम, असा 2 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. अवघ्या 12 तासात गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार आतिश घाडगे, संजय शिर्कें, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, विक्रम पिसाळ, स्वप्तिल माने, स्वप्निल दौंड, सचिन ससाणे, रोहित निकम यांचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी कौतुक केले.
हेवी वाचा - Chandrasekhar Guruji: वास्तूतज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकमध्ये चाकून भोकसून हत्या