अजित पवारांच्या अडचणी वाढणार? जरंडेश्वर कारखाना ताब्यातून जाणार? किरीट सोमय्या लक्ष घालणार

author img

By

Published : Sep 28, 2021, 10:34 AM IST

सातारा

आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, किरीट सोमय्या जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार आहेत. तसेच या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनीही सोमय्यांची साताऱ्यात भेट घेतली. तसेच, कारखाना अजित पवारांच्या ताब्यातून काढून घ्यावा, अशी मागणी केली. तर हा मुद्दा लावून धरू, असे आश्वासन सोमय्यांनी दिले.

सातारा : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. दरम्यान, ते रात्री उशिरा साताऱ्यात पोहोचले. तेथे जरंडेश्वर कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी लक्ष घालण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची चिंता वाढली आहे. कारण जरंडेश्वर कारखाना अजित पवारांचा आहे.

साताऱ्यात किरीट सोमय्या

कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सोमय्यांची भेट

आज (28 सप्टेंबर) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास किरीट सोमय्या यांचे सातारा विश्रामगृहावर आगमन झाले. आज सकाळी त्यांनी भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक किसन घाडगे व जरंडेश्वर कारखाना बचाव समितीचे कार्यकर्ते शंकरराव पाटील, श्रीरंग संपते, पोपट शेलार, अक्षय बर्गे आदींनी सोमय्या यांची भेट घेतली.

कारखाना अजित पवारांच्या ताब्यातून जाणार?

कारखाना अजित पवार यांच्या ताब्यातून काढून तो सभासदांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी कारखान्यांच्या या पदाधिकाऱ्यांनी केली. तर, या प्रश्नी आपण निश्चित लक्ष घालूय तसेच लवकरच जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊ, असे आश्वासन सोमय्यांनी यावेळी दिले.

यापूर्वी 20 सप्टेंबरला किरीट सोमय्या कोल्हापूरला जात होते. मात्र त्यांना निम्म्यातूनच कराड येथून मुंबईला परत जावे लागले होते. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मध्यस्थी करत कोल्हापूरला येऊ नये, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन किरीट सोमय्या पुन्हा मुंबईला गेले होते. त्यांना कराड येथे पोलिसांनी रोखले होते. यानंतर ते मुंबईला परत गेले. मात्र, यावेळी पुन्हा कोल्हापूरला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज ते कारमधून कोल्हापूरला जात आहेत.

हसन मुश्रीफांवर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप

कराडमध्ये त्यांनी मुंबईला परत जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे कारखान्यांमध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. 'हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावई यांनी शेल कंपनीच्या मार्फत हा घोटाळा केला आहे. ब्रिक्स इंडिया कंपनीला संबंधित कारखाना चालवायला दिला होता. या कालावधीत हा भ्रष्टाचार झाला', असे किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी या घोटाळ्यासंदर्भाची कागदपत्रं आपण ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयाला देणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रंही सुपूर्द केली.

अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

20 सप्टेंबर रोजी कराडमध्ये असताना 'ठाकरे सरकार मला कुठे आणि किती अडवणार?' असा सवाल सोमय्या यांनी यापूर्वी केला होता. 'पुढच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे कोर्लई येथे खरेदी करण्यात आलेल्या जमीनीची पाहाणी करणार आहे. पुढच्या सोमवारी ही पाहाणी करणार आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरेदी केलेल्या कारखान्यालाही भेट देणार आहे. पारनेर येथील साखर कारखान्याचीही पाहाणी करणार आहे. ठाकरे सरकार मला कुठे आणि किती रोखणार आहे?', असा सवाल सोमय्या यांनी केला होता. तसेच, ठाकरे सरकारला मी घाबरत नसल्याचेही सोमय्या म्हणाले होते. दरम्यान, सोमय्यांनी मुश्रीफांनंतर आता अजित पवारांना घेरायला सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? याकडे लक्ष लागले आहे.

अनिल परबांच्याही अडचणीत वाढ

तर, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयने छापा टाकला. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई केली. अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयर नोंदवला, अनिल परब यांचा नंबर लवकरच येईल असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले होते.

हेही वाचा - रविंद्र वायकरांचा किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

हेही वाचा - प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

हेही वाचा - जालन्यासह राज्यातील चार ठिकाणी री-रोलिंग मिलवर आयकर विभागाचा छापा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.