ETV Bharat / state

सातारा जिल्हा बँक निवडणूक : कराड, पाटणमध्ये चुरशीची लढाई, सहकार मंत्री, गृहराज्यमंत्री रिंगणात

author img

By

Published : Nov 11, 2021, 4:14 AM IST

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे अर्ज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कराड आणि पाटण सोसायटी मतदार संघात आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे कराड- पाटणमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.

Big Fight in Karad, Patan, Minister of Co-operation, Minister of State for Home Affairs on the ground in Satara District Bank Election
सातारा जिल्हा बँक निवडणूक : कराड, पाटणमध्ये चुरशीची लढाई, सहकार मंत्री, गृहराज्यमंत्री रिंगणात

सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कराड आणि पाटण सोसायटी मतदार संघात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे अर्ज रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे कराड-पाटणमधील बिग फाईटकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.

दोन साडूंचे राष्ट्रवादी उमेदवारांपुढे आव्हान -

सहकार मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पूत्र सत्यजितसिंह पाटणकरांसमोर आव्हान निर्माण केले आहे. शंभूराज देसाई हे प्रथमच जिल्हा बँक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पाटण सोसायटी मतदार संघात 103 तर कराड सोसायटी मतदार संघात 140 मते आहेत. दोन्ही मतदार संघातील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज्य पातळीवरून प्रयत्न झाले. परंतु, त्याला यश आले नाही. त्यामुळे दोन्ही मतदार संघात दोन मंत्री मैदानात राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आव्हान दिलेले गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि उंडाळकर पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील हे नात्याने साडू आहेत. त्यामुळे कराड आणि पाटणमधील लढतीची सातार्‍याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

कराड सोसायटीमधील लढत राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची -

कराड सोसायटी मतदार संघातील सहकार मंत्री विरुध्द उंडाळकर पूत्र ही लढत राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आमदार आहेत. सलग पाचवेळा ते आमदार झाले आहेत. यावेळी त्यांनी सोसायटी मतदार संघातून शड्डू ठोकला आहे. मागील निवडणुकीत गृहनिर्माण, पाणी पुरवठा मतदार संघात त्यांनी उदयनराजेंविरोधात निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सध्या ते स्वीकृत संचालक आहेत. आता समोरच्याच दाराने बँकेत जायचे, असा निर्धार करत त्यांनी कराड सोसायटी मतदार संघातूनच निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतला. परंतु, दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचा हा पारंपारिक मतदार संघ असल्याने त्यांचे पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी देखील याच मतदार संघातून लढण्यावर ठाम राहत आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे कराड सोसायटी मतदार संघात बिग फाईट होणार, हे निश्चित आहे.

विलासकाका उंडाळकर होते सलग 54 वर्षे संचालक -

माजी सहकार मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर हे 1967 पासून सलग 11 वेळा कराड सोसायटी मतदार संघातून जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. सलग 54 वर्षे त्यांनी कराड सोसायटी मतदार संघाचे नेतृत्व केले. या दरम्यान, जिल्हा बँकेचा रिमोटही त्यांच्याच हाती होता. त्यांच्या शिस्तीमुळे सातारा जिल्हा बँकेने नाबार्डचे सलग सहा पुरस्कार पटकावले. बँकेला सहकार क्षेत्रात अग्रगण्य ठेवण्यात विलासकाकांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 4 जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे.

विलासकाकांच्या योगदानाचा विसर -

ज्येष्ठ नेते दिवंगत किसन वीर, अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील-वाठारकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदार संघातून त्यांच्या वारसांना बँकेत संचालक म्हणून घेण्यात आले. त्याच धर्तीवर विलासकाकांच्या निधनानंतर कराड सोसायटी मतदार संघातून त्यांचे पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना संधी दिली जाईल, असे वाटत होते. परंतु, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उंडाळकर पुत्राला न्याय दिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला विलासकाकांच्या योगदानाचा सोयीस्कर विसर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पाटणमध्ये शंभूराज-सत्यजितसिंह पहिल्यांदाच रिंगणात -

पाटण तालुका सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे अनेक वर्षे जिल्हा बँकेत प्रतिनिधीत्व करत होते. परंतु, यावेळी त्यांनी आपले पूत्र सत्यजितसिंह यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पाटणकरांचे पारंपारिक विरोधक गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही मैदानात उडी घेतली आहे. हे दोन्ही उमेदवार प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरले असून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

हेही वाचा - हिवाळा सुरू झालाय, 'अशी' घ्या आपल्या त्वचेची काळजी... त्वचारोग तज्ज्ञांची विशेष मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.