ETV Bharat / state

Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात स्वागत; पादुकांना नीरा स्नान

author img

By

Published : Jun 29, 2022, 12:01 PM IST

Dnyaneshwar maharaj palakhi
Dnyaneshwar maharaj palakhi

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात सातारा जिल्ह्यात आगमन झाले ( Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi In Satara ) आहे.

सातारा - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात सातारा जिल्ह्यात आगमन झाले ( Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi In Satara ) आहे. पाडेगाव येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. माऊलींच्या पादुकांचा नीरा नदीत स्नान सोहळा पार पडला. भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामात तल्लीन झालेले वारकरी, भाविक भक्तीरसात चिंब होऊन गेले.

नीरा स्नान सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. हा स्नान सोहळा पाहण्यासाठी नदीवरील पुलावर भाविकांची गर्दी उसळली होती. नीरा नदीतील स्नानानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पाडेगाव (ता. खंडाळा) आगमन झाले. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी साताऱ्यात

पालकमंत्र्यांचे साकडे - गेल्या दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या संकटामुळे पालखी सोहळा होऊ शकला नाही. आता कोरोनाचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे. यामुळे पालखी सोहळ्यात उत्साह दिसत आहे. वारकर्‍यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या जीवनात सुख-समृध्दी येऊ दे, असे साकडे पालकमंत्र्यांनी माऊलींना घातले.

पालखीचा जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम - संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम आहे. पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकर्‍यांसाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून, गॅस, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच, मोबाईल टॉयलेटचीही सोय करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा - शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावरून शनिदर्शन खुले, भरावे लागणार 500 रुपये शुल्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.