ETV Bharat / state

'स्वाभिमानी'ची सांगली जिल्हा बँकेवर धडक; जयंत पाटील पाठीशी घालत असल्याचा आरोप

author img

By

Published : Mar 19, 2022, 3:13 PM IST

agitation
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची विशेष सभा (Sangli District Central Co-operative Bank) उधळून लावण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्याने यावेळी झटापटीचा प्रकार घडला.

सांगली - जिल्हा मध्यवर्ती बँकेची विशेष सभा (Sangli District Central Co-operative Bank) उधळून लावण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्याने यावेळी झटापटीचा प्रकार घडला. बड्या नेत्यांच्या संस्थांची कर्ज आणि व्याजमाफीचा निर्णय जिल्हा बँकेच्यावतीने घेण्यात येणार होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले होते.

बड्या नेत्यांना कर्ज आणि व्याज माफी-

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या अनेक सहकारी खासगी संस्थांची कोट्यवधी रुपयांची कर्ज आणि त्यांची व्याज माफ करण्याचा निर्णय बँकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय बँकेच्या विशेष सभेमध्ये घेण्यात येणार होता.

कर्ज व व्याज माफीला स्वाभिमानीचा विरोध -

कर्ज आणि व्याजमाफी निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतला. शेतकऱ्यांसाठीच्या असणाऱ्या बँकेत हा प्रकार म्हणजे चुकीचा असल्याचा आरोप करत हा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी सांगली जिल्हा बँकेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेसमोर बोंबाबोंब आंदोलन जाहीर करत सभा उधळून लावण्याचा इशाराही देण्यात आला होता.

सभा उधळण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न-

त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू झालेली,सभा उधळण्यासाठी बँकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बँकेच्या प्रवेशद्वारावरच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे पोलीस आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापटीचा प्रकार घडला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

जयंत पाटील पाठीशी घालत आहेत-

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बड्या धेंडाना पायघड्या आणि शेतकऱ्यांवर जप्तीचा बुलडोझर चालविण्याचा विचित्र प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या बँकेत राजकारण्यांनी गोरखधंदा चालवला आहे. यासर्वाला जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा असा संघर्ष सुरू असताना जिल्हा बँकेत मात्र राष्ट्रवादीकडून भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या कारखान्याचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये या बड्या नेत्यांच्या संस्थांची कर्जमाफी आणि व्याजमाफी होऊ देणार नाही, प्रसंगी तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी यावेळी दिला आहे.

"त्या"बाबतचा प्रस्ताव नाबार्डकडे-

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी,या सर्व प्रकरणाबाबतचा जो काही निर्णय असेल, तो नाबार्डकडे प्रस्तावाद्वारे पाठवला जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्यावतीने बड्या नेत्यांच्या संस्थांचा कर्ज आणि व्याज माफीचा निर्णय तूर्त तरी थांबला आहे, असे म्हणावे लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.