ETV Bharat / state

सांगली महापालिकेने सुरू केला 'पुस्तक बँक' उपक्रम

author img

By

Published : Jan 1, 2021, 3:41 PM IST

Updated : Jan 2, 2021, 7:56 PM IST

पुस्तक बँक
पुस्तक बँक

सांगली महापालिकेने नवीन वर्षात एक नवा संकल्प केला आहे. नागरिकांना नवनविन साहित्य वाचनाची मेजवानी मिळणार आहे.

सांगली - सांगली महापालिकेने नवीन वर्षात एक नवा संकल्प केला आहे. नागरिकांना नवनविन साहित्य वाचनाची मेजवानी मिळणार आहे. कारण सांगली महापालिकेने पुस्तक बँक उपक्रम सुरू केला आहे. रद्दीत जाणारी, घरात पडून असणारी पुस्तके पालिकेला दान करण्याचा हा उपक्रम असुन नागरिकांनी आपल्याकडील पुस्तके दान करावीत, असे आवाहन करत आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वतः पासून पुस्तक दान अभियानाची शुभारंभ केला आहे.

मनपा आयुक्त नितीन कापडणीस
"पुस्तक दान,सर्व श्रेष्ठदान" पालिकेचा उपक्रम-सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे वि.स.खांडेकर वाचनालयाबरोबर अन्य वाचनालयाचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्यामुळे या वाचनालयामध्ये वाचकांना पुस्तकांचा खजाना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने "पुस्तक दान,सर्व श्रेष्ठदान" हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत ज्या व्यक्तींच्याकडे वाचनात नसलेली पुस्तके इतर लोकांना आणि विद्यार्थ्यांना पालिकेच्या वाचनालयाच्या माध्यमातून उपयोगात येण्यासाठी महापालिकेच्या पुस्तक बँकेत आपली पुस्तके दान करायची आहेत.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या वि.स.खांडेकर वाचनालयात असणाऱ्या वाचनालय विभागाशी संपर्क साधून जमा पुस्तके जमा करावीत. जेणेकरून आपण दान केलेल्या पुस्तकाचा उपयोग वाचकांना होईल,असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

स्वतःपासून पुस्तक दान उपक्रमाची सुरुवात-

सांगली महापालिकेचे वि.स.खांडेकर वाचनालय पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हजारो पुस्तके याठिकाणी वाचनासाठी उपलब्ध आहेत. मात्र यासह पालिकेचे वाचनालयाचे आता आधुनिकीकरण करण्यात येत आहेत. त्यामुळे वाचनालयात अधिक पुस्तक ठेवण्याची जागा उपलब्ध होणार आहे. त्यादृष्टीने याठिकाणी जनतेच्या सहभागातुन पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी पुस्तक बँक उपक्रम घेण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.

अनेक लोक बऱ्याच वेळा पुस्तक खरेदी करतात, आणि वाचन झाल्यानंतर ती पुस्तके घरात पडून असतात. त्यामुळे नागरिकांनी अशी पुस्तके इतरांच्या वाचनात येण्यासाठी या पुस्तक बँकेच्या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन करत आयुक्त कापडणीस यांनी त्यांच्या घरातील पुस्तके पालिकेच्या वाचनालयाला देऊन स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

सांगलीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे-

सांगलीकर वाचक प्रेमी नागरिकांनी सांगली महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचा स्वागत केले आहे. अश्या उपक्रमामुळे ज्यांच्या घरात कथा, कादंबरी, स्पर्धा परीक्षा, अशी पुस्तके वाचनानंतर धूळखात किंवा रद्दी मध्ये जातात. पण पालिकेने सुरू केलेल्या पुस्तक बँक उपक्रमामुळे अश्या पुस्तकांचा फायदा वाचकांना होणार आहे. त्यामुळे सांगलीकर जनतेने यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे, असे मत वाचक असणाऱ्या वैशाली सारडा यांनी व्यक्त केले आहे.

रद्दीत जाणारी पुस्तके वाचनात येणार-

पुस्तक दानाच्या या अभिनव संकल्पनेमुळे सांगली महापालिका क्षेत्रात रद्दीत जाणाऱ्या पुस्तकांना वाचनात आणण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यातच नवनवीन वाचलेली पुस्तके नागरिकांकडून दान केली जाणार. या पुस्तकांमुळे वाचनालयाच्या वाचकांना मोठी पर्वणीच मिळणार आहे. त्यामुळे सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची पुस्तक बँकेची संकल्पना राज्यात आदर्शवत ठरेल यात शंका नाही.

हेही वाचा- फायजर, बायोएनटेक कंपनीच्या कोरोना लसीला WHOची परवानगी

Last Updated :Jan 2, 2021, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.