Mahila Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी' विजेती

author img

By

Published : Mar 24, 2023, 10:54 PM IST

Updated : Mar 24, 2023, 10:59 PM IST

Etv Bharat

महाराष्ट्रातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिने विजयश्री मिळवली आहे. यासह पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा पहिला बहुमान प्रतिक्षाने स्वत:च्या नावे केला आहे. विजेत्या प्रतिक्षाने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला हरवत सामना आपल्या नावे केला. मान्यवरांकडून विजेत्या प्रतिक्षाला चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र केसरीची विजयी गदा प्रतिक्षाच्या खांद्यावर

सांगली: महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीमध्ये पार पडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा तालीम संघाने सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुल या स्थळी कुस्तीचा सामना रंगला. दोन दिवस या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या. 45 किलो वजनी गटापासून 76 किलो वजनी गटातील महिला मल्ल्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली. सर्व गटातील अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या कुस्त्या पार पडल्या. प्रशासनाकडून महाराष्ट्र केसरी सामन्यासाठी सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि कल्याणच्या वैष्णवी पाटील हिच्यात अंतिम लढत पार पडली.

प्रतिक्षाचा गौरव: ज्यामध्ये प्रतीक्षा हिने लपेट डावावर् वैष्णवीला अवघ्या दोन मिनिटात चितपट करत विजय मिळवला आहे आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब हा सांगली जिल्ह्याला मिळवला आहे. महिला महाराष्ट्र केसरीची प्रथम विजेती प्रतीक्षा बागडी हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. तिला सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील या मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन प्रतिक्षाचा गौरव करण्यात आला.

पुरुष गटातील महाराष्ट्र केसरींना बक्षीस: पुण्यात नुकतीच ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे बक्षिस वितरण शुक्रवारी करण्यात आले. यावेळी विजयी मल्लांना केवळ भेटवस्तू न देता त्याची कायदेशीर व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही वाहने विजेत्यांना सुपूर्त केली गेली. यावेळी विजयी मल्ल थार, टॅक्ट्ररसह, जावा गाड्या व अन्य बक्षिसांचे मानकरी ठरले.

बक्षिसांचे वितरण: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी झाले. महाराष्ट्र केसरी मुख्य किताब विजेता, उपमहाराष्ट्र केसरी, १८ वजनी गटातील विजेते, सांघिक विजेते, उपविजेते यांना घोषित केलेल्या थार, टॅक्ट्ररसह जावा गाड्या व अन्य बक्षिसांचे वितरण झाले.

बक्षीस वितरण : कोथरुड येथील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या या समारंभात यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' ठरलेला शिवराज राक्षे याला महिंद्रा थार गाडी व रोख पाच लाखाचे बक्षीस, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीस प्रायोजक व संयोजक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले. प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना येजडी जावा गाडी व रोख बक्षीस देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, शिरीष देशपांडे, प्रवीण बढेकर, विशाल गोखले, चंद्रकांत भरेकर, योगेश दोडके, संदीप भोंडवे, विलास कथुरे, भुजबळ परिवार यांच्यासह विजेते आणि वजनी गटांना जावा गाड्या दिलेले मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: Rahul Gandhi Disqualified : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लढत राहणार', तर प्रियंका गांधीही आक्रमक

Last Updated :Mar 24, 2023, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.