सांगली - जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. आरेवाडीच्या बिरोबा बनात कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या शपथेवरून बिरोबाच्या बनात खोट्या शपथा घेतल्यावर पूर्ण वाटोळं होतं, असा मिश्कील टोला लगावला. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असणारे भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनीही हसत दाद दिली.
बिरोबा बनातून जयंत पाटलांचा पडळकरांवर निशाणा -
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी याठिकाणी ढालगाव विभागातील टेंभू सिंचन योजना जलपूजन कार्यक्रम पार पडला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी सभा पार पडली. याप्रसंगी भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आरेवाडीच्या बिरोबा बनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, बिरोबा हे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाला आपण अर्थमंत्री असताना निधी दिला होता. त्यांनतर आपले सगळे चांगले होत आले आहे. तर खासदार संजयकाका पाटील देवाला खूप मानतात. त्यांनी महाराष्ट्रात नव्हे, तर देशातील एकाही देवाला संजयकाका यांनी सोडले नसेल. याचे उदाहरण देताना माझ्या तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड या ठिकाणी देखील आदित्यनाथ योगी यांच्यासोबत येऊन गेले होते. त्याचा फोटो पाहिल्यानंतर आम्हालाही धक्का बसला त्यामुळे संजयकाका यांची देवावर खूप भक्ती आहे, असे म्हणाले.
खोटी शपथ घेतली की वाटोळे होते -
मंत्री पाटील म्हणाले, सांगण्याचा मथितार्थ आहे की, बिरोबा देवाचा आशीर्वाद घेतल्यास बऱ्याच गोष्टी यशस्वी होऊ शकतात. पण खोट्या शपथा घेतल्या, तर पूर्ण वाटोळं होतं, असा मिश्किल टोला अप्रत्यक्षपणे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला. हे सांगताना त्यांचा रोख संजयकाका यांच्याकडे होता. यावेळी संजय काका पाटील यांनी हसत याला दुजोरा दिला.
काय होती पडळकरांची शपथ -
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी काही वर्षापूर्वी आरेवाडीच्या बनात हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर मेळावा घेतला होता. त्यावेळी जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजपाला मतदान न करण्याची शपथ उपस्थितांसह घेतली होती. आपण असो किंवा आपली आई, बहिण, भाऊ कोणालाही आरक्षण मिळेपर्यंत भाजपाला मतदान करायचं नाही, अशी शपथ या मेळाव्याच्या दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी घेतली होती.