ETV Bharat / state

खासदार संजयकाका पाटील यांचे फक्त अश्वासनेच! स्वाभिमानीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पुकारले बेमुदत आंदोलन

author img

By

Published : Jul 21, 2021, 10:02 PM IST

स्वाभिमानीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पुकारले बेमुदत आंदोलन
स्वाभिमानीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पुकारले बेमुदत आंदोलन

जिल्ह्यातील तासगाव आणि नागेवाडी येथील 2 साखर कारखाने भाजपा खासदार संजयकाका पाटील हे चालवतात. मात्र, गेल्या वर्षीची 40 ते 50 कोटी ऊसाची बिले अद्याप देण्यात आली नाहीत. या बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या संपर्क कार्यालयावर धडक मोर्चा काढत, बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सांगली - थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भाजपा खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. तासगावमध्ये शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या संपर्क कार्यालयावर धडक मोर्चा काढत, बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

स्वाभिमानीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात बेमुदत आंदोलन पुकारले

'खासदारांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर'

जिल्ह्यातील तासगाव आणि नागेवाडी येथील 2 साखर कारखाने भाजपा खासदार संजयकाका पाटील हे चालवतात. मात्र, गेल्या वर्षीची 40 ते 50 कोटी ऊसाची बिले अद्याप देण्यात आली नाहीत. त्यामुळे थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या एक महिन्यापासून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन आणि इशाऱ्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी वेळो-वेळी तातडीने ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र, तीनवेळा आश्वासन देऊनही संजयकाका पाटील यांनी ते पाळले नाही, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मंगळवारपासून खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात बेमुदत आंदोलन छेडले आहे. दरम्यान, तासगाव शहरामध्ये असणाऱ्या पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

'आधी पैसे मगच माघार'

शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी आंदोलनस्थळी धाव घेत शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत, येत्या पंधरा दिवसांत कारखान्याची बिल दिले जातील, असे आश्वासन दिलो. मात्र, आतापर्यंत तीनवेळा देण्यात आलेली आश्वासने पाळण्यात आली नाहीत. त्यामुळे, शेतकऱ्यांना जोपर्यंत थकीत बील मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर, या ठिकाणी असणारे शेतकरी शहरामध्ये उद्यापासून घरोघरी जाऊन भीक मागून भाकरी गोळा करून, गुजारना करतील. पण या ठिकाणाहून मागे हटणार नाहीत, अशी भूमिकाही महेश खराडे यांनी जाहीर केली आहे.

'पंधरा दिवसात देणी देणार'

खासदार संजयकाका पाटील म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये बंद पडलेली दोन कारखाने आपण चालवण्यास घेतले, या दोन्ही कारखान्यांचा गाळप हंगाम पुर्ण झाला. मात्र, साखर अद्याप तशीच पडून आहे. ती विक्री होऊ शकली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची देणी भागवणे कठीण झाले आहे. पण, शेतकऱ्यांनी देणी कोणत्याही परिस्थितीमध्ये देण्याची आपली भूमिका आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. काही बँकांकडे कर्जही मागितले आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यात येतील, असे आश्वासन पाटील यांनी दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.