Sangli News: कौतुकास्पद! मुलीसाठी चक्क मुलगा दिला दत्तक; ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक

author img

By

Published : Feb 14, 2023, 3:38 PM IST

Updated : Feb 14, 2023, 3:48 PM IST

adopted a boy

मुलीसाठी चक्क, मुलगा दत्तक देण्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या शेगावमध्ये हा प्रकार घडला आहे. मोठ्या भावाने, आपल्या लहान भावाच्या मुलीला दत्तक घेत, त्याला आपला लहान मुलगा दत्तक दिला. तसेच मुलीचा नामकरण सोहळा अगदी दिमाखात गावात साजरा केला. आता या अनोख्या दत्तक प्रकरणाची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.

मुलीसाठी दिले चक्क मुलगा दत्तक


सांगली : मुलगी झाली म्हणून मुलीला रस्त्यावर फेकण्याचे आणि आईच्या गर्भातच मुलीला मारण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. मुलगाच हवा ही धारणा आज देखील समाजात रूढी परंपरेप्रमाणे कायम आहे. पण दुसऱ्या बाजूला मुलगी हे लक्ष्मी मानून अनेक जण मुलीचा स्वीकार करतात. मुलीच्या जन्माचा उत्सव देखील साजरा करतात. पण याहीपेक्षा एक वेगळी घटना सांगलीच्या जत तालुक्यातल्या शेगाव येथे घडली आहे. मुलगीसाठी चक्क आपल्याला लहान मुलाला दत्तक देऊन, मुलगी दत्तक घेण्याचा हा प्रकार घडला आहे. गावातल्या सुखदेव माने यांच्या कुटुंबातील दोघा सख्ख्या भावंडांनी जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.



मुलगी हवी होती : बिरुदेव सुखदेव माने आणि त्यांचा लहानं भाऊ आप्पासो सुखदेव माने हे आपल्या आई–वडीलांसमवेत एकत्र कुटुंबातच राहतात. बिरुदेव माने यांना एक मुलगा होता तर सुखदेव माने याला एक मुलगी. दोन्ही भावांना काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा दोन मुले झाली. ज्यामध्ये मोठ्या भाऊ बिरूदेव माने याला पुन्हा मुलगा तर लहान भाऊ अप्पासो माने याला पुन्हा दुसरी मुलगी झाली. आप्पासो माने यांना मुलगा हवा होता, तर बिरुदेव माने यांना मुलगी हवी होती.

दिमाखात केला नामकरण सोहळा : या दोघा भावांनी मग आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घरच्यांशी विचार विनिमय करून आपल्या मुलांना एकमेकांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला. मोठ्या भावाला लहान भावाने आपली मुलगी द्यायची आणि त्या बदल्यात मोठ्या भावाने लहान भावाला मुलगा दत्तक द्यायचे ठरले. यासाठी मग या दोघा भावंडांनी नामकरण सोहळा देखील आयोजित केला. सगळ्या गावाला निमंत्रणही दिले. लहान भावाने आपली 2 महिन्याची मुलगी अन्विता हि मोठ्या भावाला तर, मोठ्या भावाने आपला 2 वर्षाचा मुलगा आरुष हा लहान भावाला दत्तक दिला. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. दत्तक पुत्र आणि दत्तकपुत्रीच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया देखील दोघा भावांनी पूर्ण केली आहे. शेगावच्या माने कुटुंबियांचा या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



दत्तकपुत्रीची संकल्पना मांडली: मोठ्या भावाला एक मुलगा, एक मुलगी तर लहानं भावाला दोन्ही मुलीच त्यामुळे घरात आनंदोत्सव होता. हा आनंद आणखी द्विगुणीत करण्याचा निर्णय थोरले बंधू बिरुदेव माने यांनी घेतला. बिरुदेव माने हे सरकारी सेवेत, आरोग्य विभागात काम करत आहेत. त्यामुळे त्यांना स्त्री जन्माचे महत्व माहित होते. त्याशिवाय गेली अनेक वर्षे ते पुरोगामी विचारांच्या चळवळीत काम करत आहेत. त्यांची सामाजिक जाणं प्रचंड दांडगी आहे. त्यामुळे आपल्याला मुलगी झाल्याचा आणि भावाला मुलगा झाल्याचा आनंद होईल. या भावनेने त्यांनी भावाजवळ दत्तकपुत्र आणि दत्तकपुत्रीची संकल्पना मांडली. त्यावर भावानेही लगेच होकार दिला. दोन्ही दाम्पत्यांनी यासंदर्भात सविस्तर विचार केला आणि त्यानंतर ही गोष्ट त्यांनी आपल्या आई – वडिलांना सांगितली. त्यांनीही त्याचे स्वागत केले. यानंतर त्यांनी आपली बहीण, भाऊजी, सर्व पाहुणे रावळे, शेजापाजारी, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांनाही या संदर्भातली माहिती दिली. विशेष म्हणजे या सर्वांनीच त्यांचे जोरदार स्वागत केले.



अन्विता २ महिन्यांची: बिरुदेव माने यांना दोन मुले होती. थोरल्या मुलाचे नाव शिवम् बिरुदेव माने, वय वर्षे ५ तर, लहानं मुलाचे नाव आरुष बिरुदेव माने वय वर्षे २, तर लहानं भाऊ आप्पासो सुखदेव माने यांना दोन्हीही मुलीच होत्या. मोठी मुलगी संस्कृती ही ४ वर्षांची आहे. तर लहानं मुलगी अन्विता ही अवघ्या २ महिन्यांची आहे. आरुषला दत्तक देवून अन्विताला दत्तक घेण्याचा निर्णय झाला. तसाच अन्विताला दत्तक देवून आरुषला दत्तक घेण्याचाही निर्णय अन्विताच्या आई – वडिलांनी घेतला. अन्विता २ महिन्यांची आहे. त्यामुळे तिचे बारसे घालून नाव ठेवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात आले. तर दुस-या बाजूला दत्तक देण्याघेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रियाही पार पाडण्यात आली. तांत्रिक बाबींची सर्व पुर्तता करण्यात आली. कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही याची काळजी बिरुदेव माने यांनी घेतली होती. भटजीसह सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.



मुलीचे केले बारसे : पहिल्यांदा सर्व उपस्थितांच्या साक्षीने मुलीचे बारसे घालून तिचे नाव अन्विता असे ठेवण्यात आले. सर्वांना तिच्या नावाच्या घुग-या वाटण्यात आल्या. पाळणा म्हणण्यात आला. आत्त्याबाई, अनिता समाधाने मोटे यांनीही तिचे कोड कौतुक केले. नाव ठेवण्याच्या समारंभातील तिची सर्व भुमिका पार पाडली.आहेर माहेर, सत्कार समारंभ, साऊंड सिस्टिमं, छायाचित्रणं, चिमुरड्यासह सर्वांना नविन कपडे, नविन पाळणा, चहा–पाणी, नाश्ता, जेवण एखाद्या विवाह सोहळ्यालाही लाजवेल अशा थाटात आणि विधिवत पुजा अर्चा करुन आपली परंपरा जोपासत, भटजींच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.


अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू : दत्तकपुत्र आणि दत्तकपुत्री आप आपल्या नव्या आई – वडिलांच्या, दुस-या अर्थाने काका आणि काकूंच्या कडेवर आली. त्यावेळी सर्वांचा ऊर अभिमानाने भरुन आला. हा सत्कार सोहळा पाहताना अनेकांच्या डोळ्यात आनंदआश्रूही तरळले. त्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचा जंगी कार्यक्रमे आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांनी या सर्वांना आशिर्वाद देत शुभेच्छाही दिल्या. आई तानूबाई, वय वर्षे ६० आणि वडिल सुखदेव वय वर्षे ६५, एकुलती एक बहीण अनिता या सर्वांनीही उपस्थितांचे आभार मानले.

निर्णयाचे मनापासून स्वागत : एकमेकींनी आपली मुलं दत्तक देवू केल्याने दोन्ही जाऊबाईंचे कधी भांडणही होणार नाही. तसेच भावाभावातही दुरावा निर्माण होणार नाही. जागा ,जमिनीचे वाटप करताना येणारा नात्यांमधला कडवटपणाही नाहीसा होईल. कारण ही दोन्ही मुले आता सर्व कुटुंब एकत्रित ठेवणार आहेत. संपत्ती कालांतराने का असेना त्यांचीच होणार आहे. दोन्ही मुले घरातच एकमेकांसमोर लहानाची मोठी होणार आहेत. त्याशिवाय दोन्ही मुलीच झाल्या म्हणून कोणाला मनस्तापही होणार नाही. कोण बोलणारही नाही. त्याऊलट दोघा भावंडांना प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वांनीच मनापासून स्वागत केले आहे. तसेच हा आदर्श सर्वांनाच विचार करायला लावणारा, नाती टिकवून ठेवणारा आपलेपणा जोपासणारा व दिशादर्शक आहे.



सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव : आजही आपल्या कानावर अशा अनेक गोष्टी येतात की, मुलगी जन्माला येण्याआधी गर्भातच तिची हत्त्या केली जाते. अगदी स्त्रीभृण हत्त्या बंदी असली तरीही अनेकदा कच-याच्या ढिगा-यात, कचराकुंडीत स्त्री जातीचे अर्भक सापडते. आजही स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार नाकारण्याचा खटाटोप कांहीजण करत असतात. तिला तिच्या हक्क आणि अधिकारांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. मुलगी जन्माला घातली म्हणून तिच्या मातेला विविध प्रकारचे जाच सहन करावे लागतात. मुलगी हे परक्याचं धन आहे. या गैरसमजूतीमधून, पुन्हा अनेक गैरसमज निर्माण केले जातात. अशा सर्व लोकांच्या डोळ्यात या कुटुंबाने अंजन घालण्याचे महान कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




हेही वाचा: Little Siblings Found In Well बेपत्ता असणाऱ्या चिमुरड्या बहिणभावांचे मृतदेह आढळले विहिरीमध्ये

Last Updated :Feb 14, 2023, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.