ETV Bharat / state

हा तर हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार - गोपीचंद पडळकर

author img

By

Published : Aug 26, 2021, 2:51 PM IST

Updated : Aug 26, 2021, 3:01 PM IST

ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली आहे.

सांगली - हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर केली आहे. तसेच असे तर नाही, की राणे साहेबांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितांनी भरलेला आहे, तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल, असा टोलाही पडळकर यांनी लगावला आहे. ते आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.

'हेच का तुमचे महाराष्ट्र मॉडेल'

शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेवरून पडळकर यांनी राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई, असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणेरड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही, हेच का तुमचे महाराष्ट्र मॉडेल, असा सवाल त्यांनी केला आहे.

'सामनाचे दैनिक ''बाबरनामा’''त रूपांतर'

ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे. हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उजळ माथ्याने महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारायचे, की त्यावेळेस यांची अस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते.

'मग एवढे का घाबरत आहात?'

माननीय संजय राऊत, कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला, अन्यथा 'तुमच्या हम करे सो' कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोके पडतील. हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असे तर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल, अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली आहे.

Last Updated :Aug 26, 2021, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.