ETV Bharat / state

कोकण रेल्वे मार्गावर चालत्या रो-रोमधून पडला ट्रक

author img

By

Published : Nov 18, 2020, 1:37 PM IST

Truck fell out of ro-ro train on kokan route
कोकण रेल्वे मार्गावर चालत्या रो-रोमधून पडला ट्रक

मुंबईहून गोव्याकडे जाणारी रो-रो रात्री एक वाजण्याच्या दरम्यान दिवाणखवटीपासून एक किलोमीटर अंतरावर आली असता रो-रो वरील एक ट्रक अचानक खाली पडला. सुदैवाने ट्रकमधील चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच खाली उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर आज पहाटे विचित्र अपघात घडला. खेड ते करंजाडीच्या दरम्यान चालत्या रो-रो गाडीवरील ट्रक खाली पडल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. रो-रो सेवा म्हणजे रेल्वेच्या वॅगनवरून ट्रकची ने-आण केली जाते. सुदैवाने ट्रकमधील चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच खाली उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

रात्री एक वाजता झाला अपघात
मुंबईहून गोव्याकडे जाणारी रो-रो रात्री एक वाजण्याच्या दरम्यान दिवाणखवटीपासून एक किलोमीटर अंतरावर आली असता रो-रो वरील एक ट्रक अचानक खाली पडला. काही अंतरावर ट्रकला हादरे बसत होते. त्यामुळे ट्रकमधील चालकाने खाली उडी मारली. वेगाने जाणाऱ्या गाडीवरून कोसळलेल्या ट्रकचा चुराडा झाला. यामध्ये ट्रेनचा मधला भाग रुळावरून खाली उतरला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. खाली पडलेल्या ट्रकमध्ये लोखंडी प्लेट होत्या.

पहाटे चारच्या सुमारास वाहतूक सुरळीत
हा प्रकार घडल्यानंतर अपघात रिलिफ व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. रुळावरून खाली आलेल्या रो-रोचा भाग वर आणला गेला. यासाठी सुमारे दोन तासाचा कालावधी लागला. पहाटे चारच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार कसा घडला याची चौकशी सुरु झाली असून कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहेत. खाली पडलेला ट्रक योग्य पद्धतीने बांधला नसावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हादरे बसून तो खाली पडला असावा. अन्यथा वेल्ड फेल्युअरमुळे रो-रोचा भाग खाली उतरल्याने हा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबत चौकशी सुरू झाली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर चालत्या रो-रोमधून पडला ट्रक....
काही गाड्यांच्या वेळेवर परिणाम
हा प्रकार झाल्यानंतर गाड्या त्या-त्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या.

हेही वाचा - चिपळुणमध्ये गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती; इतिहासाची साक्ष देणारा उपक्रम

हेही वाचा - पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? शिवसेना आमदाराची जीभ घसरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.