ETV Bharat / state

महाविकास आघाडीत मुख्यमंत्र्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही - विनायक राऊत

author img

By

Published : Oct 31, 2020, 12:42 PM IST

Updated : Oct 31, 2020, 12:52 PM IST

खासदार विनायक राऊत
खासदार विनायक राऊत

खासदार विनायक राऊत म्हणाले, की आदरणीय अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. आमचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे. त्याच्या अनेक पटींनी माननीय अशोक चव्हाणांचा त्यांच्यावर अधिकार आहे.

रत्नागिरी - महाविकास आघाडीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा कधीही भेदभाव केला नाही, असे शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. त्यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. महाविकास आघाडीचे संपूर्ण कुटुंब माझे आहे, हे समजून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणावर अन्याय करणे हे त्यांच्या कधी स्वप्नातही आले नसेल. त्यांनी इतर सर्व अधिकार हे मंत्र्यांच्याच हातात दिलेले आहेत, हा त्यांचा मोठेपणा आहे. संपूर्ण देशात एकमेव मुख्यमंत्री असे आहेत, की त्यांनी स्वतःकडे कोणतेही अधिकार ठेवलेले नाहीत. सत्तेचे विकेंद्रीकरण काय असते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेले आहे.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्र्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही

पुढे खासदार राऊत म्हणाले, की आदरणीय अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. आमचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे. त्याच्या अनेक पटींनी माननीय अशोक चव्हाणांचा त्यांच्यावर अधिकार आहे. अशोक चव्हाणांनी एखादी गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगितली तर ती नाकारणे हे मुख्यमंत्री कधीच करू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस पक्षाला डावलले जात असल्याचा आरोप राज्यातील काही प्रमुख नेत्यांनी केला होता.

Last Updated :Oct 31, 2020, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.