ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवले

author img

By

Published : May 22, 2021, 6:47 PM IST

आंब्यांचे नुकसान
आंब्यांचे नुकसान

यंदा हंगाम लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आंबा अधिक तयार होण्याची शक्यता असतानाच या वादळामुळे झाडावरील आंबा खाली पडला. सुमारे चाळीस टक्के पीक वाया गेले असून बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरीतील हापूसला देखील बसला आहे. यंदा हंगाम लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आंबा अधिक तयार होण्याची शक्यता असतानाच या वादळामुळे झाडावरील आंबा खाली पडला. सुमारे चाळीस टक्के पीक वाया गेले असून बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

चक्रीवादळाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवले

कोकणच्या हापूसची गोडी अगदी सातासमुद्रापार पोहचली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत निसर्गाचे शुक्लकाष्ठ लागले आहे. यावर्षी तर नोव्हेंबर महिन्यापासूनच नैसर्गिक आपत्तीचा आंब्याला सामना करावा लागला. पाऊस लांबल्याने आधीच हंगाम लांबणीवर जाणार हे स्पष्ट होते. त्यात सुरुवातीला तुडतुड्याने पालवीवर प्रादुर्भाव केला. त्यामुळे पालवीवर औषध फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतर 3 ते 4 वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच पिकाच्या पोषक थंडी पडली नाही, शिवाय दोन वेळा 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान वाढले. त्यामुळे आंब्याचे पीक आधीच धोक्यात आले होते. त्यात आता चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.

वादळामुळे झाडे कोसळली
वादळामुळे झाडे कोसळली

आर्थिक गणित बिघडले -

पहिल्या टप्प्यात उत्पादन झाले नाही. खऱ्या अर्थाने 10 एप्रिलपासून आंबा बाजारात दिसू लागला होता. गेल्या पंधरा दिवसात वाशी बाजारातही दिवसाला 30 हजार पेटी दाखल होत होती. मोहोर उशिराने आल्याने 15 ते 31 मे या कालावधीत उत्पादन हाती येईल, अशी शक्यता होती. मात्र अचानक अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळाने बागायतदारांच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी फेरले. रविवारी पहाटेपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळाने धुमाकुळ घातला होता. दुपारी हे वादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. ताशी 55 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने हापूसच्या बागा उन्मळून पडल्या. झाडावरील आंबे टपाटप जमिनीवर कोसळत होते. काढणीयोग्य आंब्यापासुन ते कैरीपर्यंतची सर्वच फळे खाली पडली. बागांमध्ये आंब्यांचा सडा पहायला मिळत आहेत. बागांमधील झाडेच कोसळल्याने शेतकरी कायमचा उत्पन्नाला मुकला आहे. या वादळात शेवटच्या टप्प्यातील आंब्यांची पूर्णतः वाताहात झाली. आंबा पडून आपटल्यामुळे कॅनिंगलाही तो घेतला जाणार नाही. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान बागायतदारांना सहन करावे लागणार आहे.

आंब्यांचे नुकसान
आंब्यांचे नुकसान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.