Konkan Hapus Mango : जीआय मानांकनामुळे हापुसला वेगळी ओळख; मात्र नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात

author img

By

Published : May 10, 2022, 12:25 PM IST

Konkan Hapus Mango

दरवर्षी बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसत असतो. कधी पाऊस लांबणे, तर कधी थंडी गायब होणे, तर गेल्या काही वर्षांत वादळांचा फटका देखील आंब्याला बसला आहे. गेली 2 वर्ष तर कोरोनाच्या संकटात आंबा उत्पादक शेतकरी सापडले होते. तसेच वाढत्या किडरोगामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचा फवारणीचा खर्च प्रचंड वाढत आहे.

रत्नागिरी - कोकण म्हटल्यानंतर कोणाच्याही डोळ्यासमोर येतो तो निळाभोर अथांग पसरलेला समुद्र. याशिवाय निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या प्रती काश्मीरमध्ये आपल्याला दिसतो तो कोकणचा हापूस. कोकणचा राजा म्हणून हापूसची ओळख आहे. त्यात या हापूसला जीआय मानांकनही मिळाले आहे. या हापूसची चव अगदी सातासमुद्रापार पोहोचली आहे. त्यामुळे अनेकजण या कोकणच्या राजाच्या प्रेमात पडतात.

जीआय मानांकनामुळे हापुसला वेगळी ओळख

'जीआय’ मानांकन मिळाल्यामुळे कोकणातल्या हापूसची एक वेगळी ओळख आता निर्माण झाली आहे. या मानांकनामुळे हापूस हे नाव फक्त कोकणातल्या 5 जिल्ह्यांनाच वापरता येतं. पालघर हापूस, रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, दापोली हापूस असं नाव वापरता येऊ शकतं. मात्र यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. हापूससाठी जीआय मानांकन मिळालेल्या चार संस्थांकडे ही नोंदणी करणं आवश्यक आहे. ‘जीआय’ मानांकन हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकार संस्था रत्नागिरी, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे व केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था केळशी दापोली या संस्थांना मिळालं आहे. त्यामुळे सर्वच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अधिकृतरीत्या हापूसची विक्री करण्यासाठी या चार संस्थांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. आंबा हे कोकणातील प्रमुख पीक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 60 हजार हेक्टर क्षेत्रावर हापूसची लागवड करण्यात आली आहे. तर कोकणात 40 ते 50 हजार आंबा बागायतदार आहेत.

नैसगिर्क संकटांचा सामना - गेल्या काही वर्षांमध्ये हापूस आंबा वातावरणातील बदलामुळे संकटात सापडला आहे. दरवर्षी बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसत असतो. कधी पाऊस लांबणे, तर कधी थंडी गायब होणे, तर गेल्या काही वर्षांत वादळांचा फटका देखील आंब्याला बसला आहे. गेली 2 वर्ष तर कोरोनाच्या संकटात आंबा उत्पादक शेतकरी सापडले होते. तसेच वाढत्या किडरोगामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचा फवारणीचा खर्च प्रचंड वाढत आहे. नियमितपणे पंधरा दिवसांनी बागायतदार कीटकनाशकांची फवारणी करतात. पण कीडरोगांमुळे 7 ते 8 दिवसांनी फवारणी करावी लागत आहे. सर्वसाधारणपणे एका फवारणीला हेक्टरी 25 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो.

हेही वाचा - Nitin Gadkari : जोराचा वारा आल्याने पुल कोसळला; 'IAS' अधिकाऱ्याचे गडकरींना उत्तर

मे महिन्यात दर नसल्याने फटका - सुरुवातीला आंब्याला चांगला दर मिळतो. मार्च एप्रिलमध्ये 10 ते 15 टक्के आंबा तयार होतो. तेव्हा दर चांगला मिळतो. त्यानंतर मात्र मे महिन्यात आंबा मोठ्या प्रमाणात तयार झाल्याने आंब्याला दर मिळत नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. आंब्याची निर्यात ही जगभर होत असते. मध्यपूर्वेतील देश त्याचबरोबर इंग्लंड तसेच युरोप खंडातील देश अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, जपान या देशांमध्ये आंब्याची निर्यात होते. पण प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये आंब्याची निर्यात मोठया प्रमाणावर होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.