Shashikant Warishe Death Case : पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरण; रिफायनरी विरोधी संघटनांसह ग्रामस्थांचा तहसिलदार कार्यालयावर भव्य मोर्चा

author img

By

Published : Feb 11, 2023, 10:30 PM IST

Updated : Feb 11, 2023, 11:05 PM IST

Shashikant Warish Death Case

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूच्या निषेधार्थ रिफायनरी विरोधी संघटनांसह ग्रामस्थांनी तहसिलदार कार्यालय भव्य मोर्चा काढला. सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेसह अन्य विविध संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी शासनाला दिले.

रिफायनरी विरोधी संघटनांसह ग्रामस्थांचा तहसिलदार कार्यालयावर भव्य मोर्चा

रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूच्या निषेधार्थ रिफायनरी विरोधी संघटनांसह ग्रामस्थांनी तहसिलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेसह अन्य विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शहरातील बंदरधक्का-जवाहरचौक-तहसिलदार कार्यालय असा आज भव्य मोर्चा काढला. यावेळी ‘पत्रकार शशिकांत वारिशे अमर रहे’,‘लोकशाहीच्या खुन्याला शिक्षा झालीच पाहीजे, ‘एकच जिद्द ..रिफायनरी रद्द’ अशा मोर्चेकर्‍यांनी दिलेल्या जोरदार घोषणांनी जवाहरचौकासह तहसिलदार कार्यालय परिसर दणाणला.

घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा : सोमवारी, कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा थार गाडीच्या धडकेमध्ये अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकरविरोधात राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे. सध्या संशयित आरोपी पोलिस कोठडीत आहे. या घटनेचे तालुक्यासह राज्यभर पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना, कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना यांसह अन्य विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज भव्य मोर्चा काढला.

याठिकाणी निघाला मोर्चा : शहरातील बंदरधक्का येथून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये विविध गावांमधील तरूणांसह महिला, जेष्ठ ग्रामस्थ मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. बंदर धक्का-जवाहरचौक- तहसिलदार कार्यालय असे अंतर पायी कापत हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर धडकला. तहसिलदार कार्यालयाच्या आवारामध्ये आल्यानंतर मोर्चेकर्‍यांनी एकच गर्दी करीत जोरदार घोषणाबाजी सुरू करीत तहसिलदार कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी मोर्चेकर्‍यांच्या हातामध्ये असलेले ‘कै. शशिकांत वारीशे यांच्या खुन्याला शिक्षा झालीच पाहीजे,‘ खुनाचा सुत्रधार कोण ? चौकशी झालीच पाहीजे, ’ आदी संदेश देणार्‍या फलकांसह प्रतिकात्मक पुतळा सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते.

सखोल चौकशीची मागणी : तहसिलदार कार्यालयाच्या आवारामध्ये रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम यांनी बोलताना रिफायनरी विरोधातील लढा रद्द होईपर्यंत कायम सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला. या सार्‍या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करताना रिफायनरी प्रकल्प रद्द हिच खर्‍या अर्थाने पत्रकार शशिकांत वारीशे यांना श्रद्धांजली असल्याचे मतही त्यांनी मांडले. यावेळी शशिकांत वारीशे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तर, बंदरधक्का येथे खासदार विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशासनाला निवेदन सादर : बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेसह अन्य विविध संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी शासनाला दिले. हे निवेदन तहसिलदार शितल जाधव यांच्याकडे रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम, बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि अन्य विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने सुपूर्द केले.


हेही वाचा : Journalist Shashikant Warishe Death Case : पत्रकार शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

Last Updated :Feb 11, 2023, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.