ETV Bharat / state

अलिबागमध्ये जम्बो लसीकरण, एकाच दिवशी 2300 ग्रामस्थांना लस

author img

By

Published : Jul 2, 2021, 9:32 PM IST

अलिबाग
अलिबाग

अलिबाग तालुक्यातील धोकावडे, सातिर्जे या गावात एकाच दिवशी 2300 जणांचे लसीकरण करण्यात आले. येथे ग्रामस्थांच्या संख्येच्या तुलनेत लसीचे डोस कमी पडत आहेत. त्यामुळे लोक लसीपासून वंचित राहत आहेत. शिना कटारिया, त्याची मुलगी नंदिनी, मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, पॉलिसेन कंपनी आणि रोटरी क्लबच्या मदतीने इतक्या ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात प्रथमच जम्बो लसीकरण मोहिम झाली आहे.

रायगड - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सगळीकडे सुरू आहे. रायगड जिल्ह्यात लसीच्या तुटवढ्यामुळे अनेक नागरिक आजही लसीकरणापासून वंचित आहेत. अलिबाग तालुक्यातील धोकावडे, सातिर्जे गावातील ग्रामस्थही लसीपासून वंचित राहिले आहेत. यासाठी धोकावडे ग्रामपंचायत आणि मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत दोन्ही गावातील 2300 ग्रामस्थांना एकाच दिवशी लस देण्यात आली. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन गावात जम्बो लसीकरण करण्यात आले आहे.

अलिबागमध्ये जम्बो लसीकरण

अलिबागमध्ये लसीचा तुटवठा

अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र, तालुक्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने येणारा लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन पहाटेपासून रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र, नागरिकांची गर्दी पाहता अनेक नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. कोरोना आजारावर लस फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे लस मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे.

शिना कटारियांच्या पुढाकारातून 1200 जणांचे लसीकरण

धोकावडे ग्रामपंचायत हद्दीतील आणि सातिर्जे गावातील नागरिकही लसीपासून वंचित राहिले आहेत. धोकावडे-सातिर्जे परिसरात अनेक मोठ्या उद्योजकांचे बंगले आहेत. शिना कटारिया आणि त्याची मुलगी नंदिनी कटारिया या धोकावडे गावाच्या रहिवासी आहेत. गावातील ग्रामस्थ लसीपासून वंचित असल्याचे कटारिया यांना समजले. कटारिया यांनी धोकावडे ग्रामपंचायत सरपंचाला संपर्क करून लस आम्ही उपलब्ध करून देतो, असे सांगितले. त्यानुसार गावातील बंगले धारकांना नंदिनीने मेसेज टाकून मदतीचे आवाहन केले. नंदिनीच्या आवाहनातून 11 लाख रुपये जमा झाले. त्यातून अपोलो रुग्णालयाकडून 1200 लसीचे डोस उपलब्ध करण्यात आले. त्यानुसार गावातील 1200 ग्रामस्थांचे आरोग्य विभाग, अपोलो रुग्णालय आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लसीकरण करण्यात आले. याबाबतची माहिती धोकावडे ग्रामपंचायत सरपंच जयश्री म्हात्रे यांनी दिली आहे.

मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टकडून 1100 जणांचे लसीकरण

सातिर्जे गावात मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पॉलिसेन कंपनी आणि रोटरी क्लबच्या मदतीने साडेबारा लाख रुपये खर्च करून 1100 लसीचे डोस ब्रीच कँडी रुग्णालयामार्फत उपलब्ध करण्यात आले. त्यानुसार, मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातिर्जे गावातील आणि तालुक्यातील एकूण 1100 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजा ठाकूर यांनी दिली आहे.

पहिल्यांदाच जिल्ह्यात जम्बो लसीकरण

अलिबाग तालुक्यात धोकावडे, सातिर्जे आणि परिसरातील 2300 नागरिकांना एकाच दिवशी कोरोना लस मिळाली आहे. त्यामुळे लसीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना ग्रामपंचायत, सामाजिक संस्था याच्या मार्फत लस मिळाल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले आहे.

हेही वाचा - महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची सुरक्षा भिंत पालिका लवकरच पाडणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.