ETV Bharat / state

Ashok Saraf : अशोक सराफ यांचा 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कारा'ने गौरव

author img

By

Published : Aug 20, 2023, 9:33 PM IST

Updated : Aug 20, 2023, 10:17 PM IST

पुण्यात ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ (Veteran colorist Ashok Saraf) यांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार (Shivshahir Babasaheb Purandare Award) प्रदान करण्यात आला. पद्मश्री पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.

Ashok Saraf
Ashok Saraf

सुधीर मुनगंटीवार विचार व्यक्त करताना

पुणे : महाराष्ट्र शासनातर्फे पद्मश्री पुरस्कारासाठी प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Famous actor Ashok Saraf) यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल, अशी माहिती आज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे मुगंटीवार यांनी म्हटलं आहे.

अशोक सराफ यांची 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया आजच्या या पुरस्काराने मला आनंद झाला. राज्य सरकार पद्मश्री पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करत आहे हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली. पद्मश्री पुरस्कार नावाची शिफारस करण्यासाठी उशीर झाला का? या प्रश्नावर सराफ म्हणाले, असे काही नाही. आता याबाबत शिफारस केली हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे.

सराफांचा पुरंदरे पुरस्काराने गौरव : बालगंधर्व रंगमंदिरात मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-२०२३ प्रदान (Shivshahir Babasaheb Purandare Award) करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. ब. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.

सराफ विनोदाचे बादशहा : 'अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला. सराफ यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटलं जातं. समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचं, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचं कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केलं. त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. अभिनयासोबत त्यांची शब्दफेकही ताकदीची होती', असं मुनगंटीवार म्हणाले.

महाराजांचा विचार प्रत्येक घरात : 'आज बाबासाहेब पुरंदरे जरी नसले, तरी प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचे जीवनकार्य पोहोचविण्याचे कार्य करणे ही त्यांना आदरांजली ठरेल, असं मुनगंटीवार यांनी नमूद केलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक घरात पोहोचवला, तर देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही. संशोधकाच्या भूमिकेतून प्रसाद तारे यांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पुस्तकरूपानं मांडल्याबद्दल त्यांनी लेखकाचं अभिनंदन देखील केलं'.

छत्रपतींची वाघनखे परत : 'महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरं करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने छत्रपतींची वाघनखे परत देण्याची विनंती ब्रिटिश म्युझियमने मान्य केली आहे', अशी माहिती मुनगंटीवार यांनी बोलताना दिली.

सराफांची नाटकं हमखास यशस्वी : 'अशोकमामांविषयी प्रत्येकाच्या मनात आदराचं स्थान आहे. अशोक सराफ यांची कामगिरी सतत उंचावत गेली. त्यांनी जीवनात यशाची अनेक शिखरं गाठली, असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अशोक सराफ यांची नाटकं हमखास यशस्वी ठरायची. त्यांचे अनेक चित्रपट, नाटकं यशस्वी ठरले. आज कर्तृत्व, नम्रता एकाच ठिकाणी आढळत नाही. कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या आगामी 'श्रीमंत योगी' नाटकाला सहकार्य करण्यात येईल, असंही पालकमंत्री म्हणाले. अशोक सराफ यांच्याकडे पाहिल्यानंतर समाजाच्या भल्यासाठी अनेक माणसं चांगलं काम करत असल्याची खात्री पटते', असं पाटील यांनी म्हटलं आहे.

रसिकांचं कायम पाठबळ : यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले, कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला मिळणारं प्रेक्षकांचं पाठबळ महत्वाचं आहे. याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. असं पाठबळ कायम महाराष्ट्राच्या रसिकांनी दिलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 'जाणता राजा'च्या रूपानं उभ्या केलेल्या नाट्यशिल्पाला तोड नाही. या नाटकात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेला आवाज देऊन या नाटकाशी मी जोडला गेलो. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराच्या रूपानं बाबासाहेबांना मी आपल्या घरात घेऊन जातं आहे, अशा शब्दात शराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराजांवर संशोधनासाठी सरकार्य : उच्च शिक्षण विभागाने संशोधनावर भर दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधनासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही लेखक प्रसाद तारे यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रसन्न परांजपे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचावेत असा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन : यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य प्रसाद तारे यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज-व्यक्तिमत्वाचे भावदर्शन' या पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.

Last Updated :Aug 20, 2023, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.