Ganesh Jayanti 2023: दगडूशेठ हलवाई' गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी ; गर्दी संपेपर्यंत जड वाहतूकीस बंदी

author img

By

Published : Jan 25, 2023, 11:14 AM IST

Ganesh Jayanti 2023

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आज पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. त्यापूर्वी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक देखील झाला. गर्दी संपेपर्यंत वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

'दगडूशेठ' गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा

पुणे : गणेश जन्म निमित्ताने आज पहाटेपासूनच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच मंदिरावर तिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मंदिर पहाटे ३ पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.



दर्शनासाठी भाविकांची गर्दी : माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आज सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

सर्व प्रकारच्या जड वाहतूकीस बंदी : अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी असणार नाही. स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहतूकीस पीएमपीएमएल बसेस वगळून बंदी असेल. प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोरुन नागदेव ऑईल डेपो चौक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नो-पार्किंग, नो-हॉल्टींग करण्यात येत आहे.

पीएमपीएमएल बसेसचे मार्ग : या कालावधीत पीएमपीएमएल बसेससाठी प्रीमियर गॅरेज चौक, मंगला सिनेमागृहासमोरुन उजवीकडे वळून खुडे चौक, उजवीकडे वळून पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रीमियर गॅरेज चौक असा पुणे मनपा येथील वर्तुळाकार बस मार्ग राहील. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला सिनेमागृहासमोरुन पुढे उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, डावीकडे वळून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पुरम चौक मार्गे जातील.



वाहनांचा मार्ग : स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला थिएटर समोरुन पुढे डावीकडे वळून राष्ट्रवादी काँग्रेस भवन उजवीकडे वळून कुंभारवेस चौक डावीकडे वळून शाहिर अमर शेख चौक मार्गे जातील. कोथरुडकडून येणाऱ्या व अप्पा बळवंत चौकमार्गे पुणे स्थानककडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून कुंभार वेस चौकमार्गे पुणे स्थानकाकडे जातील.

चारचाकी वाहनांसाठी मार्ग: ही वाहने स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज मार्गाने बालगंधर्व चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील. जिजामाता चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाण्याकरीता पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप रोडने किंवा उजवीकडे वळून लक्ष्मी रोडने सोन्या मारुती चौक, बेलबाग चौक, डावीकडे वळून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरुन गाडगीळ पुतळा चौक. डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहिर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरून गाडगीळ पुतळा चौकमार्गे फडके हौद चौकाकडे जाताना (प्रेमळ विठोबा मंदिराकडे जाणारा रस्ता वगळून) वाहने जिजामाता चौकातूनच डावीकडे वळून जातील.


वाहतूक पर्यायी मार्गाने : अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळविण्यात येत आहे. ही वाहने अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील. बाजीराव रोडने सायंकाळी महत्वाच्या व मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पुरम चौकातून बाजीराव रोडने मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळविण्यात येईल.

अंतर्गत वाहतूकीत आवश्यकतेप्रमाणे बदल : सदरची वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. त्याचप्रमाणे मानाचे गणपतींच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तसेच शहराचे मध्यवर्ती भागातील वाहतूकीची परिस्थती पाहून शिवाजी रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोड व इतर मिरवणुक मार्गावरील अंतर्गत वाहतूकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.



हेही वाचा : Ganesh Jayanti 2023 : सुवर्णपाळण्यात होणार 'दगडूशेठ' गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा; फुलांची केली आरास व विद्युतरोषणाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.