ETV Bharat / state

बारामती : ऊसतोडणी कामगारांचा ऊस वाहतूकदारांना करोडो रुपयांचा चुना

author img

By

Published : Dec 3, 2020, 3:29 PM IST

ऊस तोडणीसाठी आणलेल्या कामगारांनी ऊस वाहतूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावल्याची घटना बारामती येथे घडली आहे. त्यामुळे ऊस वाहतूकदारांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

sugarcane harvesting workers cheating sugarcane transporters in baramati
बारामती : ऊस तोडणी कामगारांचा ऊस वाहतूकदारांना करोडो रुपयांचा चुना

बारामती - जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम जोरदार सुरू असताना सहकारी आणि खासगी कारखान्यांवर येणाऱ्या ऊसतोडणी टोळ्यांनी ऊस वाहतूकदारांच्या हातावर तुरी देत करोडो रुपयांचा चुना लावला आहे. दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसतोड टोळ्या पळून जाण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिल्याने उस वाहतूकदार अडचणीत आले आहेत. एकट्या सोमेश्वर कारखान्यावर जवळपास ४०० बैलगाडी टोळ्या करार करूनही ऊसतोडणीसाठी आल्या नसून, काही टोळ्या येवून परत गेल्या आहेत.

ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडून बीड, अहमदनगर, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगारांसोबत करार केले जातात. यावेळी त्यांना आगाऊ उचल दिली जाते. पूर्वी कारखाना संपूर्ण उचल देत असे, मात्र आता कारखाना ३० टक्के रक्कम मुकादमाला देतो आणि मुकदम त्याच्याकडील ७० टक्के रक्कम स्वतः गुंतवत असतात. त्यामुळे कारखान्याकडून घेतलेली उचल मुकादमांना ऊसतोडणी कामगार आले किंवा नाही आले, तरी जमा करावीच लागते. साखर हंगाम सुरू होण्यापूर्वीच दोन ते तीन महिने या ऊसतोडणी कामगारांबरोबर ऊस वाहतूकदारांना करार करावा लागतो. कारखान्यांकडून ७०-३०चे सूत्र अंमलात आणल्याने कारखान्याने याची पूर्ण जबाबदारी वाहतूकदारांवर सोपवली जाते. तसेच कारखाना ज्या वाहन मालकाला उचल देणार, त्याच वाहनमालकांनी ऊस टोळ्यांशी करार करायचे असल्याने वाहनमालक या टोळ्यांवर अवलंबून असतात.

अंधाराचा फायदा घेत करतात पोबारा -

करार करताना ऊसतोडणी कामगार आणि मुकादम यांच्यात करार केला जातो. असे असले तरी हे ऊसतोडणी कामगार हंगाम सुरू झाल्यावर मालकाचा ताळमेळ बघत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पोबारा करतात. प्रसंगी कर्नाटक किंवा गुजरात राज्यात जाऊन ऊसतोडणी करत असतात. त्यामुळे त्यांना शोधणार कसे, असा प्रश्न वाहतूकदारांना पडतो. दुसरीकडे कारखान्याकडून घेतलेली उचल ऊसतोड टोळीला दिलेली असते. मात्र, ऊसतोड टोळीच पळून गेल्यावर कारखान्याची उचल फेडायची कशी, असाही प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे.

वाहतुकीचा व्यवसाय केला बंद -

जिल्ह्यातील साखर कारखान्यावरील ऊसतोड टोळ्या रातोरात लाखो रुपयांची उचल घेऊन रात्रीच्या काळोखात पोबारा करत आहेत. टोळ्या पळून जाण्याचे सत्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये शेकडो ऊस वाहतूकदार करोडो रुपयांनी बुडाले आहेत. यामध्ये अनेक ऊस वाहतूकदार कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. तर अनेक ऊसवाहतूकदारांनी आपला ऊस वाहतुकीचा व्यवसाय बंद केला आहे.


प्रपंच उध्वस्त झाले -

ऊस टोळ्यांशी करार करण्याबाबत साखर कारखान्यांनी अंग काढून घेतल्याने या टोळ्यांना उचल देण्यासाठी कोणी पतसंस्थेकडून, तर कोणी सोनं मोडून कर्ज घेतले. मात्र, करार केलेल्या टोळ्या आल्याच नाहीत, तर काही टोळ्या रात्रीच्या अंधारात पसार झाल्याने मुकादम आणि वाहनमालकांना करोडो रुपयांचा चुना लागला आहे. अनेकांचे प्रपंचही उद्ध्वस्त झाले आहेत.

आर्थिक संकट राहणार -

सोमेश्वर येथील भाऊसाहेब टकले यांचे १४ लाख, आबासाहेब गर्जे यांचे ५ लाख आणि पारखे या मुकादमाकडील ३ लाख, असे २२ लाख रुपये घेऊन ऊसतोडणी कामगार पळून गेले आहेत. मोलमजुरी अथवा शेतीवाडी विकून ही रक्कम आम्हाला कारखान्याला जमा करावी लागणार आहे. गेलेली रक्कम मिळण्याची कोणतीही आशा नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षे आमच्यापुढील आर्थिक संकट कायम राहणार असल्याचे आबासाहेब गर्जे यांनी सांगितले.

हेही वाचा - जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.