पुणे: निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले (Dr Madhav Godbole) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. प्रशासकीय कारकीर्दीसोबतच ते विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखले जात होते. त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहूल, मुलगी मीरा असा परिवार आहे. त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. तत्पुर्वी ते महाराष्ट्रात मुख्य वित्तसचिव होते.
डाॅ. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. मनिला येथील आशियाई विकास बँकेत त्यांनी ५ वर्षे काम केले होते. त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. आणि पीएच्.डी. केली. १९५९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची निवड झाली. मार्च १९९३ मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव आणि न्यायसचिव असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली हाेती.
सेवानिवृत्तीनंतर डाॅ. गोडबोले जम्मू - काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, राज्याचा अर्थसंकल्प पारदर्शी व सहज समजण्याजोगा बनवण्यासाठीची एक-सदस्यीय समिती, आंध्र प्रदेश सरकारची सुशासन समिती व केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती अशा अनेक सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामे पाहिले.