ETV Bharat / state

पुण्याच्या ग्रामीण भागात वरुणराजाची दमदार हजेरी; शेती व रस्त्यांवर पाणीच पाणी

author img

By

Published : Jul 26, 2020, 7:00 AM IST

खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा होती. कडाक्याच्या उन्हामुळे खरिपाची पिके संकटात सापडली होती. शनिवारी रात्री अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा काही प्रमाणात सुखावला आहे.

rain in rural pune
पुण्याच्या ग्रामीण भागात पाऊस

राजगुरुनगर(पुणे)- महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी संध्याकाळी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागात ओढे,नाले दुथडी भरुन वाहत होते. राजगुरुनगर-भीमाशंकर मार्गावरील सातकरस्थळ येथील पुलावर पाणी आल्याने दोन तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा होती. कडाक्याच्या उन्हामुळे खरिपाची पिके संकटात सापडली होती. मात्र, मागील चार दिवसांपासून वातावरणात गारवा होता. शनिवारी रात्री अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा काही प्रमाणात सुखावला आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात शनिवारी दिवसभर कडाक्याचे ऊन होते. मात्र, वातावरणात गारवा होता त्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक वरुणराजाचे आगमन झाल्याने शेतकरी व प्रवाशांची मोठी धावपळ झाली. अनेक गावांतील ओढे नाल्यांना पाणी आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. हा वातावरणातील गारवा असाच टिकून राहिला तर पुढील काळात पाऊस पुन्हा हजेरी लावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

बटाट्याला पाऊसाने दिलासा

सातगाव पठार भागात बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र, कोरोनाच्या महामारीच्या संकटात यंदा बटाटा लागवड कमी प्रमाणात झाली. सध्या बटाट्याचे कोंब जमिनीच्या वर येत आहेत आणि वातावरणातील गारवा बटाट्यासाठी पोषक आहे. त्यात पावसाचे आगमन झाल्याने बटाटा शेतीला दिलासा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.