ETV Bharat / state

Eknath Shinde On State Sport Day : खाशाबा जाधवांचा जन्मदिवस 'राज्य क्रीडा दिन' म्हणून होणार साजरा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 9:10 AM IST

Updated : Aug 29, 2023, 12:40 PM IST

खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आता 'राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. पुणे येथील बालेवाडीत राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराचं वितरण करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते.

Eknath Shinde On State Sport Day
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण

पुणे : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, भारत 2036 च्या स्पर्धेचं यजमानपद भूषविण्याच्यादृष्टीनं पूर्वतयारी करत आहे. त्यामुळे राज्यानंही प्रत्येक क्रीडा प्रकारातील आपली बलस्थानं आणि कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 जानेवारी हा दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 'राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं यावेळी घोषित केलं. मात्र या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं आपलं क्रीडा मंत्रीपद गेल्याची सल बोलून दाखवल्यानं मोठी चर्चा करण्यात येत आहे.

शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे शिवछत्रपती 'राज्य क्रीडा पुरस्कार' वितरण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करा : यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. क्रीडा तज्ज्ञ आणि खेळाडूंच्या सहकार्यानं आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजना तयार करण्यात यावी. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यावरही भर द्यावा लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्र हे क्रीडा धोरण बनविणारं पहिलं राज्य आहे. आजही देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्याचा दबदबा आहे. महाराष्ट्रानं राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम सामूहिक कामगिरीसाठी अधिक तयारी करण्याची गरज आहे. विशेषत: स्थानिक खेळांकडंही लक्ष द्यावं लागेल, असं असंही राज्यपाल म्हणाले. राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्रानं पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

खाशाबा जाधवांचा जन्मदिन आता 'राज्य क्रीडा दिन' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारं देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्रानं घवघवीत यश मिळवलं आहे. चौथ्या 'खेलो इंडिया युवा स्पर्धे'त 56 सुवर्ण पदकांसह एकूण 161 पदकं मिळवली. तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह 140 पदकं मिळवून अव्वल कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी यश मिळवलं. ऑलिम्पिकमध्येही चांगलं यश मिळावं यासाठी सर्व सहकार्य करू. खेळाडूंनी राज्याचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर असाच उंचवावा, असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचा 'राज्य क्रीडा दिन' म्हणून घोषित केला.

पुरस्कारांच्या रकमेत वाढ : क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा नितांत आदर राज्य सरकारला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यांच्या कार्यातून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असं सांगून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना तीन लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज दिलेल्या पुरस्कार विजेत्यांनाही वाढीव पुरस्कार रक्कम देण्यात येईल, असंही त्यांनी घोषित केलं.

अजित पवारांमुळे क्रीडा मंत्रीपद गेलं : यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उघडपणानं भर कार्यक्रमात अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर क्रीडा मंत्रीपद गेल्याची सल व्यक्त केली. गिरीश महाजन यांनी मिश्किल शैलीत आपली सल बोलून दाखवली आहे. अजित पवार आमच्याकडं आले आणि माझं क्रीडा खातं काढून घेतलं, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात सरकार अग्रेसर : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन अग्रेसर आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी देण्यात आलेल्या पुरस्काराच्या रकमेत 1 लाख रूपयाऐवजी 3 लाख आणि 3 लाख रूपयांऐवजी 5 लाख रुपये, अशी वाढ करण्यासाठी लागणाऱ्या 2 कोटी 38 लाख रुपयांच्या रकमेस मान्यता देण्यात येईल. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो. तसाच दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी 'राज्य क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्याबाबत विचार व्हावा, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Anuradha Solanki : जिद्दीच्या जोरावर मिळवले यश! तलवारबाज अनुराधा सोळंकीला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर
  2. Shiv Chhatrapati Sports Award: अपंगत्वावर मात करून 'हा' ब्लेड रनर ठरला शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी
Last Updated :Aug 29, 2023, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.