ETV Bharat / state

पुण्यानं मोडला चीनचा रेकॉर्ड ; पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा केला विश्वविक्रम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 11:49 AM IST

Updated : Dec 15, 2023, 2:46 PM IST

Pune Breaks World Records
पुण्यात गोष्ट सांगण्याचा केला विश्वविक्रम

Pune Breaks World Records : बहुसंख्य पुणेकर हे गोष्टीवेल्हाळ असतात, हे कुणापासून लपून राहिलेलं नाही. याच गोष्टीवेल्हाळपणाच्या गुणामुळे पुणेकरांनी थेट विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. एकाच वेळी गोष्ट सांगण्याचा विक्रम चीनच्या नावावर नोंदवण्यात आला होता. चीनमध्ये एकाच वेळी 2 हजार 479 पालकांनी मुलांना गोष्ट सांगितली होती. मात्र पुण्यातील पालकांनी चीनचा हा विक्रम मोडला आहे. पुण्यातील 3 हजार 77 पालकांनी एकाच वेळी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगितली आहे.

पुण्यानं मोडला चीनचा रेकॉर्ड

पुणे Pune Breaks World Records : 'विद्येचं माहेरघर' अशी पुणे शहराची ओळख आहे. याच पुण्यनगरीत जगातील अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी येतात. विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही बिरुदं सार्थ ठरवणारा विश्वविक्रम पुण्यात नोंदवला गेलाय. तीन हजारहून अधिक पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट सांगत चीनचा रेकॉर्ड मोडला आहे. या विश्वविक्रमानंतर पालक आणि मुलांनी 'वंदे मातरम्, भारत माता की जय', अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. चीनमध्ये आठ वर्षापूर्वी 2 हजार 479 पालकांनी आपापल्या पाल्यांना गोष्ट सांगितली होती. मात्र पुण्यात 3 हजार 77 पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगून चीनचा विक्रम इतिहासजमा केलाय. पुण्यातल्या सुप्रसिद्ध स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात हा ऐतिहासिक क्षण जिवंत झाला.

चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम : पुणे महापालिकेच्या आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या संयुक्त विद्यमानं 'पुणे पुस्तक महोत्सव' होत आहे. त्यानिमित्तानं गुरुवारी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या, या उपक्रमात 3 हजार 77 पालकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटं गोष्टी सांगितल्या. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तिपर गीतांवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भारताच्या नावानं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड : डिजिटल युगात मुलांच्या बरोबरच पालकांना देखील वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशानं गुरुवारी पुणे महापालिका आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीनं विश्वविक्रम करण्यात आला. यावेळी 3 हजार 77 पेक्षा अधिक पालक आणि त्यांच्या पाल्यांनी सहभाग घेतला होता. यात सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्ल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या 'निसर्गाचा नाश करू नका' या पुस्तकातील धड्याचं सलग तीन मिनिटे वाचन केलं आणि मुलांना गोष्ट सांगितली. यावेळी गिनिज बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी 'पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या' हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावानं प्रस्थापित केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला.

खूप वर्षानंतर पुस्तक वाचल्याचा आनंद : सकाळच्या वेळेस स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पालकांनी आपल्या मुलांना घेऊन या विश्वविक्रमात सहभाग नोंदवला. यात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता. मुलांच्यासाठी आणि एक विश्वविक्रम होत आहे, या उद्देशानं आम्ही घरातील सर्वच कामं सोडून इथं आलो आणि खूपच चांगलं वाटत आहे. आज आम्ही मुलांना गोष्ट सांगत आहोत. डिजिटल युगात वाचनापासून खूपच लांब चाललो आहे. खूप वर्षानंतर आज पुस्तक वाचल्याचा आनंद होत आहे, असं यावेळी पालकांनी सांगितलं तर मुलांनी देखील आईला असं वाचत असताना आणि गोष्ट सांगत असताना पहिल्यांदाच पाहत असल्याचं सांगितलं.

चीनमध्ये 2 हजार 479 पालकांनी सांगितली होती गोष्ट : पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. आठ वर्षापूर्वी चीनमध्ये 2 हजार 479 पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगत विश्वविक्रम केला होता. त्यानंतर गुरुवारी पुण्यातील स. प. मैदानावर तीन हजार 66 पालकांनी एकत्रित येत आपल्या आपल्या पाल्यांना 'निसर्गाचा नाश करू नका' हा धडा वाचला आणि विश्वविक्रम केला. यानिमित्तानं 'पुणे तिथे काय उणे' ही उक्ती पुन्हा एकदा खरी ठरली आहे.

हेही वाचा :

  1. Age no barrier: आंध्र प्रदेशातील 95 वर्षीय महिलेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद
  2. Srishti Jagtap World Record: लातूरच्या 'सृष्टी'ने देशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा, सलग १२७ तास नृत्याचा विश्वविक्रम
  3. तिरुनेलवेली येथील 14 वर्षांच्या शाळकरी मुलीनं केले 100 जागतिक विक्रम
Last Updated :Dec 15, 2023, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.