ETV Bharat / state

CM Eknath Shinde : नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

author img

By

Published : Aug 7, 2023, 9:10 PM IST

लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन अनेक निर्णय घेण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जेजुरी येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे: जेजुरी येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

CM Eknath Shinde
जेजुरी येथील कार्यक्रमात नागरिकांचे हात उंचावून अभिवादन करताना मान्यवर

नागरिकांसाठी ऐतिहासिक उपक्रम: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे, हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांना यातून ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे त्याचा आपल्या परिवाराला, भागाला उपयोग होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.


जनहिताचे आणि गतिमान निर्णय: मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिले आहेत. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही ६ हजार रुपयांची भर घालणार असल्याने १२ हजार रुपये इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. जनहिताची कामे करताना केंद्र सरकारचेही सहकार्य मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ग्रामीण भागाला सक्षम करण्यावर भर: गेल्या वर्षभरात ३५ सिंचन योजनांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सहा ते सात लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासनाने घेतले. राज्याच्या विकासाला गतिमान करण्याचा आणि ग्रामीण भागाला सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. जेजुरी विकास आराखड्यामुळे परिसर सुशोभीकरणासोबत भाविकांसाठी सोई सुविधांची निर्मिती होईल, असेही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेजुरी विकासासाठी ३५० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी १०९ कोटीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. भाविकांसाठी येत्या काळात सर्व सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शासनाकडे जाण्याची गरज नाही. कारण आता शासन आपल्या दारी आले आहे. शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्याला केवळ १ रुपयात पीक विमा सुविधा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वीज देणारे फिडर सोलरवर नेऊन शेतकऱ्याला १२ तास अखंड वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.


महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न: महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बचत गटांना फिरते भांडवल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला सक्षम होतील. 'लेक लाडकी' योजनेअंतर्गत कुटुंब लखपती होईल, अशी योजना सुरू केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. BDD Chawl Worli : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा 'हा' प्रताप; मुख्यमंत्र्यांची थेट कारवाई
  2. Jitendra Awhad On NCP Claim : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणीही दावा करू शकत नाही, तो आमचाच - जितेंद्र आव्हाड
  3. Prasad Lad on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाड यांची जहरी टीका; Watch Video
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.