HSC Results 2023 : बारावीचा निकाल जाहीर; यावर्षीही कोकण विभाग नंबर वन, निकालात मुलांपेक्षा मुली ठरल्या भारी

author img

By

Published : May 25, 2023, 11:25 AM IST

Updated : May 25, 2023, 3:08 PM IST

12th Result

शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात कोकण विभागाने या वर्षीही बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज लागला. यंदा देखील या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.

पुणे : शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात यावर्षीही कोकण मंडळाने बाजी मारली आहे. तर मुंबई विभागाने निच्चांकी विक्रम केला आहे. सगळ्यात कमी मुंबई विभागाचा निकाल लागला आहे. दुपारी दोन वाजतापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल हा 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल हा 89.14 टक्के लागला आहे.

यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज लागला. यंदा देखील या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल हा 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल हा 89.14 टक्के लागला आहे. शिक्षण विभागाच्या 9 विभागांमध्ये यंदा देखील कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला असून कोकण विभागाचा निकाल हा 96.01 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी मुंबई विभागाचा निकाल हा 88.13 टक्के लागल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दुपारी पाहता येणार निकाल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय फेरी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी परीक्षेचा निकाल विद्यार्थ्याना आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.

असा बोर्डांचा निकाल : यंदा 154 विषयासाठी इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोकण विभागीय मंडळाचा निकाल पहिला तर यात पुणे विभागाचा निकाल हा 93.34 टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल हा 90.35 टक्के,औरंगाबाद विभागाचा निकाल हा 91.85 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल हा 88.13 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभगाचा निकाल हा 93.28 टक्के लागला आहे. अमरावती विभागाचा निकाल हा 92.75 टक्के लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल हा 91.66 टक्के लागला आहे. लातूर विभागाचा निकाल हा 90.37 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल हा 96.01 टक्के लागला आहे. राज्यातील एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे.

परीक्षेची प्रमुख वैशिष्टये : विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2023 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. या परीक्षेचे वेळापत्रक दिनांक 30 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीयस्तरावर जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तसेच राज्यमंडळ आणि 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत नेमलेल्या 383 समुपदेशकांनी सदर परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 करीता एकूण 154 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली. विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार माध्यमातून व इतर शाखांसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती व काड अशा सहा माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केलेली होती.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये : या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण 14 लाख 28 हजार 994 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी 91.25 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 35 हजार 879 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 35 हजार 583 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 15 हजार 775 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 44.33 आहे. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36 हजार 454 एवढी असून 35 हजार 834 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर 29 हजार 526 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 82.39 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 6 हजार 113 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6072 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 5 हजार 673 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 93.43 आहे.

हेही वाचा -

  1. HSC Results 2023 : विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली; गुरुवारी बारावीचा निकाल, 'असा' करा चेक
  2. PM Modi Returns To India : तीन देशाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले, भाजपने केले जंगी स्वागत
  3. Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; आता एनआयए करणार जयेश पुजारीचा तपास
Last Updated :May 25, 2023, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.