ETV Bharat / state

परभणी : बंद रेशन दुकानदारांवर कारवाई करण्याचे आमदार डॉ. राहूल पाटील यांचे निर्देश

author img

By

Published : May 10, 2021, 7:29 PM IST

parbhani latest news
परभणी : बंद रेशन दुकानदारांवर कारवाई करण्याचे आमदार डॉ. राहूल पाटील यांचे निर्देश

आमदार डॉ.राहुल पाटील यांनी स्वतः शहरातील अनेक रेशन दुकानदारांना भेट दिली. यावेळी त्यांना काही दुकाने बंद आढळून आल्याने अशा दुकानदारांवर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले.

परभणी - कोरोनामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र, या परिस्थितीत गोरगरिब आणि सामान्य लोकांची अन्नधान्यासाठी परवड होऊ नये म्हणून राज्य शासनाने मोफत धान्याचा पुरवठा सुरू केला आहे. परंतु हे धान्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थित पोहोचते की नाही, याची शहानिशा करण्यासाठी आज सोमवारी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी स्वतः शहरातील अनेक रेशन दुकानदारांना भेट दिली. यावेळी त्यांना काही दुकाने बंद आढळून आल्याने अशा दुकानदारांवर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले. तर व्यवस्थित धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांचे त्यांनी कौतुकही केले.

प्रतिक्रिया

बंद दुकानदारांना नोटीस -

सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे गरीब नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांचा आधार आहे. त्यामुळे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी तहसीलदार संजय बिराजदार यांच्यासोबत परभणीतील स्वस्त धान्य दुकानांना अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दुकानदारांचे रजिस्टर अद्ययावत आहे की नाही, याची पाहणी केली. तसेच शिधापत्रिका धारकांशी तथा लाभार्थ्यांना बोलून धान्याच्या दर्जाची चौकशी केली. शिवाय प्रत्यक्षात धान्याचा साठा पाहून खात्रीदेखील केली. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान त्यांना काही दुकाने बंद आढळली, त्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार बिराजदार यांना दिले. त्यानुसार तहसीलदार बिराजदार यांनी शहरातील अशा 3 दुकानदारांना नोटीस बजावली आहे.

चांगले काम करणाऱ्यांचे अभिनंदन -

यावेळी आमदार पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारीदेखील जाणून घेतल्या. तर जे दुकानदार या संकटात चांगले काम करत आहेत, धान्याचे व्यवस्थित वाटप करत आहेत, त्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले.

पुढील महिनाभराचे नियोजन -

परभणी शहरात 77 राशन दुकाने आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि रमजानचा महिनादेखील आहे. अशा परिस्थितीत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत धान्य पुरवण्यासाठी राशन दुकानदारांची यंत्रणा व्यवस्थित कार्य करते की नाही, हे पाहण्यासाठी आम्ही शहरातील राशन दुकानदारांना भेटी दिल्या. यादरम्यान काही दुकाने बंद आढळून आली, तर काही चांगल्या पद्धतीने सुरू होती. त्यामुळे बंद दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपण तहसीलदारांना दिल्याचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले. तसेच शेवटच्या घटकाला धान्य देण्यासाठी पुढील महिनाभराचे नियोजन करणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

हेही वाचा - मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बीडमध्ये केली होळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.